Thursday, July 22, 2010

शकिरा चल चला चल...!

वेलकम बॅक टू मन का रेडिओ... 172.0 एफएमवर "वॅका... वॅका'... अजूनही तमाम भारतीयांचे अंग "फुटबॉल फीवर'मुळे तापलेले आहे. फुटबॉल वर्ल्डकप संपला तरी बहुतांश क्रीडाप्रेमी शकिराचे गाणे "वॅका... वॅका' करत पुढील आयुष्य जगत आहेत. काही लोक यालाच "वाका वाका' म्हणतात. त्यावर कडी म्हणजे यावरचे विनोदही सगळीकडे "एसएमएसड्‌' झालेले आहेत. एका भारतीयाला कोणी तरी विचारले, की का रे बाबा, तू फुटबॉल वर्ल्डकप पाहायला का गेला नाहीस. त्यावर त्याचे बाणेदार उत्तर म्हणजे, "अहो, कसे जाणार. आम्ही भारतीय म्हणजे मोडेन पण वाकणार नाही. अन्‌ ती शकिरा म्हणते... "वाका वाका'... आता असले फालतू पीजे सांगून वेळ वाया घालविण्यापेक्षा ऐकू या एक गाणे...

माझ्या शकिराचा समद्यास्नी
लागलाय लळा...
माझ्या शकिराचा समद्यास्नी
लागलाय लळा...

शकिराचा महिमा काय वर्णावा... फुटबॉल वर्ल्डकपमधील तिचे गाणे अन्‌ नृत्य पाहून भारतीयांना अलौकिकत्वाचा साक्षात्कार झाला आहे. कशावरून काय म्हणता "श... श... शकिरा' असे फ्रीजमधून आवाज काढल्यासारखा बोलणारा शाहरुख तिला सहकुटुंब भेटला तेव्हाच आम्हाला याची कल्पना आली. शकिराची स्तुती करताना तो थकत नाहीय. पुढे कदाचित "बॉलिवूड' चित्रपटांमध्ये शकिरा दिसेल यात श...श...शंकाच नाही. त्या चित्रपटांची नावे कदाचित "दिलवाले शकिरा ले जाएंगे', "शकिरा है आप की कौन', "शकिरा- द किलर', "शकिरा की राजनीती', "आय लव्ह शकिरा स्टोरीज्‌' इ. इ. असू शकतील. आता कॅटरिनासारखी अमेरिकेत आयुष्य गेलेली नटी बॉलिवूडमध्ये जम बसवू शकते तर शकिरा का नाही? नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार "शकिरा शक्कर' नावाने साखरेचा एक नवा ब्रॅण्ड बाजारात येणार असून त्यासाठी उत्पादकाने शकिरालाच "ब्रॅंड अँबेसेडर' म्हणून नियुक्त केले आहे तेही फक्त 2000 कोटी डॉलर्सचा करार करून! आता या वृत्ताला कोणीही दुजोरा दिलेला नसून कोणीही जबाबदारी स्वीकारलेली नाही... आणखी एक पीजे... एकूणच आपले आयुष्य एक पीजे झाले असून मूळ आयुष्यापेक्षा पीजेच खरे असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे. असो...

सुन के तेरी पुकार,
कोई चलने को
हो ना हो तय्यार...
चल चला चल
"शकिरा' चल चला चल...!

(औरंगाबाद "सकाळ'मध्ये प्रसिद्धी तारीख ः 18 जुलै, 2010,)

Sunday, July 11, 2010

ऑक्‍टोपस बाबा की जय...!

वेलकम बॅक टू मन का रोडिओ... ऑक्‍टोपस बाबा की जय! ऑक्‍टोपस बाबांचा विजय असो... ऑक्‍टोपस बाबा चिरायू राहो... जर्मनीतील "ऑक्‍टोपस' या एका म्युझियममधील प्राण्याने फुटबॉल वर्ल्डकपमध्ये स्पेन जर्मनीला हरवून अंतिम फेरीत जाईल, हे जे काही भविष्य वर्तविले होते, ते तंतोतंत खरे ठरले आणि त्यामुळे जगभरात वरील प्रमाणे "ऑक्‍टोपस' बाबांचा डंका वाजू लागला. आता "या ऑक्‍टोपसला चुलीत घाला' किंवा "ऑक्‍टोपस फ्राय' करा, अशा संतप्त प्रतिक्रिया जर्मनी हारल्यामुळे तेथे उमटल्या हा भाग वेगळा. एकूणच काय की, जगभरात जोतिषांची, बुवाबाजांची कमतरता नसताना त्यात आता या "ऑक्‍टोपस बाबा'ची भर पडली आहे. येथून पुढे तमाम मानवजातीचे भवितव्य या असल्या प्राण्यांच्या हाती असणार याचेच हे संकेत आहेत. संकेत कसले घेऊन बसलात भारतीयांनी म्हणे या ऑक्‍टोपस बाबाच्या तोडीस तोड एक "पोपट बाबा'ही इंट्रोड्यूस केला आहे म्हणे! आता असल्या बातम्या चविष्टपणे चघळणाऱ्या हिंदी चॅनेलवाल्यांनी "पोपट बाबा' ची कॅसेट दिवसभर वाजविली नसती तरच नवल! तसे तर भविष्य सांगणारे "पोपट' आपल्याला काही नवीन नाहीत. पूर्वीच्या काळी तर रस्तोरस्ती असली "पोपटपंची' करणारे दिसून यायचेत. "हात दाखवून आवलक्षण' करून घेणाऱ्यांची संख्या आपल्याकडे कमी नसल्यामुळे अशा पोपटांची चलती होती. आता "ऑक्‍टोपस'ची क्रेझ निर्माण झाल्यामुळे येथून पुढे कदाचित रस्तोरस्ती "ऑक्‍टोपस' घेऊन बसलेले भविष्यवेत्ते दिसायला लागतील भविष्य सांगणारा "ऑक्‍टोपस' रस्त्यावर घेऊन बसणे शक्‍य आहे का, अशा ऑक्‍टोपसला भविष्य सांगण्यासाठी ट्रेंड करणे शक्‍य आहे का, यावर एव्हाना आपल्याकडे संशोधनही सुरू झाले असेल. असो. मध्यंतरी समाज सुशिक्षत झाला म्हणून म्हणा किंवा अन्य काही कारणांमुळे म्हणा रस्त्यावर "पोपटपंची' करणाऱ्यांचा धंदा थोडा मंदा झाला होता. त्यांनाही या "ऑक्‍टोपस बाबा'च्या स्टोरीनंतर हुरूप येईल. सध्या तर घराघरात भविष्य सांगणारे घुसले आहेत. त्यामुळे मोठे मजेशीर प्रसंग ऐकायला मिळायला लागलेत. आता खालचा संवाद वाचा...

संदीप (आपल्या इंजिनिअर मित्राला) ः अरे, नित्या असा घरात काय बसलाय. चल फिरून येऊत.

नित्या ः नको, नको... टीव्हीवर सांगितलंय आज मला वाहनापासून धोका आहे म्हणून. मी बाहेर निघणार नाही!

संदीप ः बरं, तुझा यंग, डायनॅमिक मुलगा काय करतोय? त्याला घेऊन जातो.

नित्या ः तो कुत्र्याबरोबर खेळतोय.

संदीप ः कुत्रा? कधी घेतला? तुला तर कुत्री-बित्री आवडत नव्हती ना!

नित्या ः काही नाही रे माझा मुलगा फारच चंचल. अभ्यासात लक्षच लागत नाही त्याचे. मग टीव्हीवर बाबाजींना फोन लावला. या वेळी पटकन फोन लागला! बाबा म्हणाले काही नाही एक कुत्रा पाळा. सर्व समस्या दूर होतील. तत्काळ कुत्रा आणला विकत.

संदीप ः बरं, आईंची तब्येत कशी आहे?

नित्या ः काही नाही रे शनि मागे लागल्यामुळे तिला "एक लाख एक वेळेस' "भुम रिम फुस्स' असला काही तरी मंत्र बाबांनी सांगितलाय. त्याचा जप सुरू असतो तिचा.

संदीप ः वहिनी काय म्हणतात?

नित्या ः कोणाला काही सांगू नको, पण तिला वयाच्या पन्नासाव्या वर्षी एक मोठा आजार होणार असे सांगितलंय बाबाजींनी!

संदीप ः मग काय झालेय. त्यांचे वय आताशी चाळीसएक असेल ना! आत्ताच चिंता कशाला करतोस?

नित्या ः अरे बाबा, आजाराच्या चिंतेनेच तर तिचे अन्‌ माझेही डोळे पांढरे व्हायची पाळी आलीय.

संदीप (चिडून) ः बरं, बरं... तुझे सर्व ग्रह शांत झालेत आणि बाबाजींनी परवानगी दिली तर मला फोन कर. मग आपण जाऊ कुठे जायचे ते!

एकूणच मंडळी, "परस्वाधिन आहे जगती, पुत्र मानवाचा' हेच खरे. ऑक्‍टोपस, पोपट, बाबाजी... यांच्या हाती आपले भवितव्य सुरक्षित आहे, असे म्हणून निवांत झोपा!

("सकाळ'मध्ये प्रसिद्धी तारीख ः 11 जुलै, 2010)