Thursday, July 22, 2010

शकिरा चल चला चल...!

वेलकम बॅक टू मन का रेडिओ... 172.0 एफएमवर "वॅका... वॅका'... अजूनही तमाम भारतीयांचे अंग "फुटबॉल फीवर'मुळे तापलेले आहे. फुटबॉल वर्ल्डकप संपला तरी बहुतांश क्रीडाप्रेमी शकिराचे गाणे "वॅका... वॅका' करत पुढील आयुष्य जगत आहेत. काही लोक यालाच "वाका वाका' म्हणतात. त्यावर कडी म्हणजे यावरचे विनोदही सगळीकडे "एसएमएसड्‌' झालेले आहेत. एका भारतीयाला कोणी तरी विचारले, की का रे बाबा, तू फुटबॉल वर्ल्डकप पाहायला का गेला नाहीस. त्यावर त्याचे बाणेदार उत्तर म्हणजे, "अहो, कसे जाणार. आम्ही भारतीय म्हणजे मोडेन पण वाकणार नाही. अन्‌ ती शकिरा म्हणते... "वाका वाका'... आता असले फालतू पीजे सांगून वेळ वाया घालविण्यापेक्षा ऐकू या एक गाणे...

माझ्या शकिराचा समद्यास्नी
लागलाय लळा...
माझ्या शकिराचा समद्यास्नी
लागलाय लळा...

शकिराचा महिमा काय वर्णावा... फुटबॉल वर्ल्डकपमधील तिचे गाणे अन्‌ नृत्य पाहून भारतीयांना अलौकिकत्वाचा साक्षात्कार झाला आहे. कशावरून काय म्हणता "श... श... शकिरा' असे फ्रीजमधून आवाज काढल्यासारखा बोलणारा शाहरुख तिला सहकुटुंब भेटला तेव्हाच आम्हाला याची कल्पना आली. शकिराची स्तुती करताना तो थकत नाहीय. पुढे कदाचित "बॉलिवूड' चित्रपटांमध्ये शकिरा दिसेल यात श...श...शंकाच नाही. त्या चित्रपटांची नावे कदाचित "दिलवाले शकिरा ले जाएंगे', "शकिरा है आप की कौन', "शकिरा- द किलर', "शकिरा की राजनीती', "आय लव्ह शकिरा स्टोरीज्‌' इ. इ. असू शकतील. आता कॅटरिनासारखी अमेरिकेत आयुष्य गेलेली नटी बॉलिवूडमध्ये जम बसवू शकते तर शकिरा का नाही? नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार "शकिरा शक्कर' नावाने साखरेचा एक नवा ब्रॅण्ड बाजारात येणार असून त्यासाठी उत्पादकाने शकिरालाच "ब्रॅंड अँबेसेडर' म्हणून नियुक्त केले आहे तेही फक्त 2000 कोटी डॉलर्सचा करार करून! आता या वृत्ताला कोणीही दुजोरा दिलेला नसून कोणीही जबाबदारी स्वीकारलेली नाही... आणखी एक पीजे... एकूणच आपले आयुष्य एक पीजे झाले असून मूळ आयुष्यापेक्षा पीजेच खरे असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे. असो...

सुन के तेरी पुकार,
कोई चलने को
हो ना हो तय्यार...
चल चला चल
"शकिरा' चल चला चल...!

(औरंगाबाद "सकाळ'मध्ये प्रसिद्धी तारीख ः 18 जुलै, 2010,)

Sunday, July 11, 2010

ऑक्‍टोपस बाबा की जय...!

वेलकम बॅक टू मन का रोडिओ... ऑक्‍टोपस बाबा की जय! ऑक्‍टोपस बाबांचा विजय असो... ऑक्‍टोपस बाबा चिरायू राहो... जर्मनीतील "ऑक्‍टोपस' या एका म्युझियममधील प्राण्याने फुटबॉल वर्ल्डकपमध्ये स्पेन जर्मनीला हरवून अंतिम फेरीत जाईल, हे जे काही भविष्य वर्तविले होते, ते तंतोतंत खरे ठरले आणि त्यामुळे जगभरात वरील प्रमाणे "ऑक्‍टोपस' बाबांचा डंका वाजू लागला. आता "या ऑक्‍टोपसला चुलीत घाला' किंवा "ऑक्‍टोपस फ्राय' करा, अशा संतप्त प्रतिक्रिया जर्मनी हारल्यामुळे तेथे उमटल्या हा भाग वेगळा. एकूणच काय की, जगभरात जोतिषांची, बुवाबाजांची कमतरता नसताना त्यात आता या "ऑक्‍टोपस बाबा'ची भर पडली आहे. येथून पुढे तमाम मानवजातीचे भवितव्य या असल्या प्राण्यांच्या हाती असणार याचेच हे संकेत आहेत. संकेत कसले घेऊन बसलात भारतीयांनी म्हणे या ऑक्‍टोपस बाबाच्या तोडीस तोड एक "पोपट बाबा'ही इंट्रोड्यूस केला आहे म्हणे! आता असल्या बातम्या चविष्टपणे चघळणाऱ्या हिंदी चॅनेलवाल्यांनी "पोपट बाबा' ची कॅसेट दिवसभर वाजविली नसती तरच नवल! तसे तर भविष्य सांगणारे "पोपट' आपल्याला काही नवीन नाहीत. पूर्वीच्या काळी तर रस्तोरस्ती असली "पोपटपंची' करणारे दिसून यायचेत. "हात दाखवून आवलक्षण' करून घेणाऱ्यांची संख्या आपल्याकडे कमी नसल्यामुळे अशा पोपटांची चलती होती. आता "ऑक्‍टोपस'ची क्रेझ निर्माण झाल्यामुळे येथून पुढे कदाचित रस्तोरस्ती "ऑक्‍टोपस' घेऊन बसलेले भविष्यवेत्ते दिसायला लागतील भविष्य सांगणारा "ऑक्‍टोपस' रस्त्यावर घेऊन बसणे शक्‍य आहे का, अशा ऑक्‍टोपसला भविष्य सांगण्यासाठी ट्रेंड करणे शक्‍य आहे का, यावर एव्हाना आपल्याकडे संशोधनही सुरू झाले असेल. असो. मध्यंतरी समाज सुशिक्षत झाला म्हणून म्हणा किंवा अन्य काही कारणांमुळे म्हणा रस्त्यावर "पोपटपंची' करणाऱ्यांचा धंदा थोडा मंदा झाला होता. त्यांनाही या "ऑक्‍टोपस बाबा'च्या स्टोरीनंतर हुरूप येईल. सध्या तर घराघरात भविष्य सांगणारे घुसले आहेत. त्यामुळे मोठे मजेशीर प्रसंग ऐकायला मिळायला लागलेत. आता खालचा संवाद वाचा...

संदीप (आपल्या इंजिनिअर मित्राला) ः अरे, नित्या असा घरात काय बसलाय. चल फिरून येऊत.

नित्या ः नको, नको... टीव्हीवर सांगितलंय आज मला वाहनापासून धोका आहे म्हणून. मी बाहेर निघणार नाही!

संदीप ः बरं, तुझा यंग, डायनॅमिक मुलगा काय करतोय? त्याला घेऊन जातो.

नित्या ः तो कुत्र्याबरोबर खेळतोय.

संदीप ः कुत्रा? कधी घेतला? तुला तर कुत्री-बित्री आवडत नव्हती ना!

नित्या ः काही नाही रे माझा मुलगा फारच चंचल. अभ्यासात लक्षच लागत नाही त्याचे. मग टीव्हीवर बाबाजींना फोन लावला. या वेळी पटकन फोन लागला! बाबा म्हणाले काही नाही एक कुत्रा पाळा. सर्व समस्या दूर होतील. तत्काळ कुत्रा आणला विकत.

संदीप ः बरं, आईंची तब्येत कशी आहे?

नित्या ः काही नाही रे शनि मागे लागल्यामुळे तिला "एक लाख एक वेळेस' "भुम रिम फुस्स' असला काही तरी मंत्र बाबांनी सांगितलाय. त्याचा जप सुरू असतो तिचा.

संदीप ः वहिनी काय म्हणतात?

नित्या ः कोणाला काही सांगू नको, पण तिला वयाच्या पन्नासाव्या वर्षी एक मोठा आजार होणार असे सांगितलंय बाबाजींनी!

संदीप ः मग काय झालेय. त्यांचे वय आताशी चाळीसएक असेल ना! आत्ताच चिंता कशाला करतोस?

नित्या ः अरे बाबा, आजाराच्या चिंतेनेच तर तिचे अन्‌ माझेही डोळे पांढरे व्हायची पाळी आलीय.

संदीप (चिडून) ः बरं, बरं... तुझे सर्व ग्रह शांत झालेत आणि बाबाजींनी परवानगी दिली तर मला फोन कर. मग आपण जाऊ कुठे जायचे ते!

एकूणच मंडळी, "परस्वाधिन आहे जगती, पुत्र मानवाचा' हेच खरे. ऑक्‍टोपस, पोपट, बाबाजी... यांच्या हाती आपले भवितव्य सुरक्षित आहे, असे म्हणून निवांत झोपा!

("सकाळ'मध्ये प्रसिद्धी तारीख ः 11 जुलै, 2010)

Sunday, June 27, 2010

Petrolless world : पेट्रोललेस वर्ल्ड...

बहेनो और भाईयों...आप पढ रहे हैं "मन का रेडिओ' 172.0 एफएम. आता वाचा सर्वात प्रथम ब्रेकिंग न्यूज! देशभरात पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्यांत असंतोषाची लाट निर्माण झाली असून ठिकठिकाणी त्याचे पडसाद उमटत आहेत. तरुण वर्गाला आपल्या पालकांकडून मिळणाऱ्या अत्यल्प "पेट्रोल भत्त्या'वर सर्वाधिक ताण पडला असून त्यांच्याकडून हा भत्ता तत्काळ वाढविण्याची मागणी होत आहे. त्याशिवाय तरुणांना शहराच्या परिसरातील "देवदर्शन', निसर्गदर्शन करणे, "अभ्यास' सहलींना जाणे शक्‍य नाही, अशी भावना व्यक्त होत आहे. वेतन आयोगामुळे पगार फुगलेल्या कुटुंबांमध्येही या दरवढीमुळे संतोष संपून असंतोष पसरला असून चिंता वाढीस लागली आहे (एरव्हीही ते कधीच संतुष्ट नसतात म्हणा, पाचवा दिला की, सहाव्याचे काय? सहावा दिला की एरियर्सचे काय?), कमी पगार असणाऱ्या पतीदेवांची खरडपट्टी काढण्यात येत आहे आणि "तुम्हीच सांभाळा हे घर, मी चालले माहेरी' अशा धमक्‍या मिळत आहेत. या सर्व बातम्या ब्रेकिंग न्यूज नव्हत्या, तर या पार्श्‍वभूमीवर आमचे एक वाचक भ्रमर ढिल्ले यांनी "पेट्रोललेस वर्ल्ड' हा नवा शोध लावला असून तो खास "मन का रेडिओ' च्या वाचकांपुढेच ठेवण्याचा चंग त्यांनी बांधला आहे, ही खरी ब्रेकिंग न्यूज आहे. ही नवीन संकल्पना, शोध काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न आमची बातमीदार बंडू भांडाफोडकर यांनी अनेक वेळा केला, पण भ्रमर ढिल्ले यांनी थेट "मन का रेडिओ'वरच मन मोकळे करण्याचा हट्ट धरल्यामुळे त्यांना येथे आणण्यात आले आहे. आता वाचा त्यांनीच डिक्‍लेअर केलेला हा शोध...

भ्रमर ढिल्ले ः पेट्रोल भरो, जल्दी करो, मेरी गाडी कबसे खडी हैं... असे म्हणण्याची आता काहीही गरज नाही. "मन का रेडिओ'च्या वाचकांना माझा सलाम. ते फारच भाग्यवान आहेत की, त्यांना माझे संशोधन फर्स्ट टाईममध्ये थेट येथेच वाचायला मिळणार आहे. मागे एकदा रामर पिल्ले नामक मानवाने पेट्रोल तयार करण्याचा दावा केला होता. पुढे त्याचे काय झाले ते सर्वांनाच माहीत आहे. पण माझे नाव "भ्रमर ढिल्ले' आहे. माझे संशोधन शंभर टक्के सक्‍सेसफुल आहे. "पेट्रोललेस वर्ल्ड' ही संकल्पना प्रत्यक्षात आली नाही, तर माझे नाव बदलून टाका! तर काय की, या पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढीमुळे आपल्या नाकात दम आणला आहे. पब्लिक फार परेशान आहे. पब्लिक करीत काही नाही, दोन-चार दिवस बोंब मारती. नंतर गुमान गाडी ढकलीत पेट्रोलपंपाला लागती, पण पब्लिक फार परेशान झाली आहे. हे लक्षात घेऊन पेट्रोलची गरजच पडू नये यासाठी काय करता येईल, याचा मी विचार केला. खूप डोका खाजवला. तेव्हा कोठे उपाय सापडला. आता जगातील कोणत्याही समस्येवर दोनच उपाय आहेत... एक म्हणजे कॉम्प्युटर आणि दुसरा म्हणजे मोबाईल! आता आपल्याला एक वेळ खायला-प्यायला नसले तरी चालेल पण या दोन गोष्टी आवश्‍यकच आहेत. तर या दोन गोष्टींचा वापर मी "पेट्रोललेस वर्ल्ड' निर्माण करण्यासाठी करणार आहे. माणसाला पेट्रोल कशाला पाहिजे. गाडीसाठी. गाडी कशाला पाहिजे वाहतुकीसाठी, एकडून तिकडे जाण्यासाठी. मग या प्रचलित पद्धतीपेक्षा मानवाला, वस्तूंना इकडून-तिकडे जाता आले, नेता आले तर? हेच मी डोके लावले. आता पेटली का तुमच्या डोक्‍यात ट्यूब? न्यूटनच्या अंगावर सफरचंद पडले आणि गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. माझ्याबाबतीत तसेच झाले. मी एक पीडी.एफ फाईल तयार करून ती एका ई-मेलला अटॅच करून मित्राला पाठिविली आणि तेथेच माझ्या "पेट्रोललेस वर्ल्ड' संशोधनाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. माझे मुख्य संशोधन हेच की, जशी फाईल पी.डी.एफ. करून इकडे-तिकडे ई-मेलद्वारे पाठवितात, तसेच माणसं, वस्तू पाठविता येतील. मी एक विशिष्ट स्कॅनर तयार करीत असून त्यातून माणूस, वस्तू गेली की तिची "पीडीएफ' फाईल तयार होईल. ती ई-मेलला अटॅच केली की, जगात कोठेही पाठविता येईल! फक्त डाऊनलोड करायचे की झाले काम फत्ते! नो पेट्रोल, नो पेट्रोल दरवाढ, नो महागाई, ओन्ली पेट्रोललेस वर्ल्ड!

बंडू भांडाफोडकर ः आत्ताच तुम्ही "स्कॅनर तयारी करीत आहे', "जगात कोठेही पाठविता येईल' अशी भविष्यकालीन वाक्‍ये उच्चारलीत. म्हणजे तुमचे संशोधन पूर्ण झालेले दिसत नाही.

भ्रमर ढिल्ले ः फारच लवकर, काही दिवसांतच म्हणाना. हे काम होऊन जाईल.

बंडू ः परत एकदा भविष्यकालीन वाक्‍ये! उठा उठा येथून... नाही तर तुम्हालाच "पीडीएफ' करतो येथून...

बहेनो और भाईयों... "पेट्रोललेस वर्ल्ड'ची भाकडकथा सादर करणाऱ्या या भ्रमर ढिल्लेचे नाव खरेच बदलावे लागेल. पण नको! आहे तेच नाव काय कमी भंकस आहे?

("सकाळ'मध्ये प्रसिद्धी तारीख ः 27 जून, 2010)

Sunday, June 20, 2010

दहावी बोर्ड प्रसन्न शिक्षण खाते प्रसन्न...

वेलकम बॅक टू मन का रेडिओ... 172.0 एफएमवर आपले स्वागत आहे. त्याचं काय आहे की, नुकतेच लागलेत दहावीचे निकाल... तमाम विद्यार्थी मंडळींवर यंदा दहावी बोर्ड प्रसन्न झाले आहे. त्याआधी अख्खे शिक्षण खातेच प्रसन्न होऊन त्याने आठवीपर्यंतच्या मुलांचे कोटी कोटी कल्याण अर्थात "ऑल इज वेल' करून टाकले. म्हणजेच आठवीपर्यंत सर्वांना आधीच पास करून टाकले! यंदा तर दहावीच्या विद्यार्थ्यांना किती मार्क पडावेत याला काही घरबंध राहिला नाही. चक्क शंभर टक्के मार्क घेणारे किती तरी विद्यार्थी निघालेत! मग 97 टक्के मार्क घेणारा विद्यार्थी रडत बसलेला आढळला तर नवल नाही. आता शिक्षण खात्याच्या दररोजच्या नवनव्या धोरणांमुळे घरोघरी, ठिकठिकाणी नवनवे प्रश्‍न निर्माण होऊ लागले आहेत. तर आजच्या एपिसोडमध्ये वाचा अशाच काही घरघरच्या, ठिकाण ठिकाणच्या कहाण्या...

घर नं. 1 ः मुलगा रुसून बसला आहे. आई-वडील त्याची धमकीवजा समजूत घालताहेत...

आई ः काय म्हणतोस ट्यूशनला जाणार नाहीस?

मुलगा ः आता कोणीच नापास होणार नाहीये... मला सांगितलंय शेजारच्या टॉमीने... मग ट्यूशनला कशाला जायचे? उगाच मला टेंशन देऊ नका. आतापर्यंत खूप छळले. सारखे आपले सकाळ, संध्याकाळ ट्यूशन, ट्यूशन.. आता ऐकणार नाही म्हणजे नाही.

बाबा ः अरे बाबा, पण आपली इतकी वर्षांची ट्यूशनची सवय कशी सुटेल. तू दुसरीला असल्यापासून तुला ट्यूशनला पाठविले. आमची हौसमौज केली नाही, पण तुला विविध ट्यूशन्स लावल्या, कशासाठी तुझ्या भल्यासाठीच ना!

आई ः ...आणि शेजारचा टॉमी त्या फेमस ट्यूशनला जातो त्याचे काय? तू ट्यूशन सोडली तर सगळे शेजारी-पाजारी, नातेवाईकांसमोर काय इज्जत राहील आमची. ते काही नाही, तू ट्यूशनला गेलाच पाहिजेस. तेवढाच चार तास आडकून पडतोस, नाही तर घरभर धिंगाणा...

घर नं. 2 (आई घरात चिंताग्रस्त बसलीय. पप्पा घामाघूम होऊन घरात प्रवेश करतात) ः

आई ः काही कळलं का?

पप्पा ः कळलं, कळलं. आंदरकी बात कळलीय. पार शिक्षण खात्यात आतपर्यंत लग्गा लावून माहिती मिळविलीय. कोणाला सांगू नकोस. फार कॉन्फिडेंशियल आहे. अगं, आठवीपर्यंतचे सर्व मुलं पास होणार, त्यांना ग्रेड मिळणार असं सांगितलंय, पण आंदरकी बात म्हणजे परीक्षा होणार, शाळा मुलांना मार्क देणार, प्रश्‍नपत्रिका पालकांना दाखविणार... फक्त मार्कशीटवर "ए', "बी', "सी', "डी' ग्रेड देणार.

आई ः यात काय आलं डोमल्याचं कॉन्फिडेंशियल. सगळ्या जगाला माहीत आहे ते!

एक शाळा (शिक्षक गप्पा मारत बसलेले) ः एक शिक्षक दुसऱ्याकडून गुटखा घेऊन तोंडात एका बाजूला व्यवस्थित सेटअप करून चर्चेला सुरुवात करतो...

शिक्षक नं.1 ः आरे बाबा आता हे नवीनच आलंय. म्हणे पोरांना नापासच करायचे नाही. त्यांचा कल पाहायचा. त्यांना विषय कळला की नाही, त्यावर भर द्यायचा.

शिक्षक नं. 2 ः आधी आपलं बरं होतं बाबा. पेपर काढायचा, पेपर तपासायचा. पास-नापास केले, की झंझट खतम.

शिक्षक नं. 3 ः माहितीय माहितीय किती प्रामाणिकपणे पेपर तपासत होतोत आपण... पुढंही तोच प्रामाणिकपणा कायम राहील...(एकमेकांना टाळी देतात).

असो. एकूणच या "ऑल इज वेल' धोरणामुळे झालेय काय की, विद्यार्थी पार मोकाट सुटलेत! आपल्या आई-वडिलांना जुमानेसे झालेत. पालक परेशान झालेत. काही शिक्षक नेहमीप्रमाणेच "प्रामाणिक' राहणार आहेत. खरोखरचे प्रामाणिक शिक्षक कोणत्याही सिस्टिममध्ये विद्यार्थी घडविण्याचे काम करणारच आहेत. काय म्हणता, विद्यार्थी बिचारे आता मोकळा श्‍वास घ्यायलेत, लगेच तुमची किरकिर झाली का सुरू? तुमचंही बरोबर आहे. ओके... येथेच संपवूया आपली ही "घर घरची कहाणी...'



("सकाळ'मध्ये प्रसिद्धी तारीख ः 20 जून, 2010)

Sunday, June 13, 2010

"गोल'गप्पे..!

वेलकम बॅक टू "मन का रेडिओ'... 172.0 एफएमवर आपले "गोल'गप्पे (काही लोक "गोलगप्पे'ला गुपचूप-गुपचूप, पाणीपुरी असेही म्हणतात, पण येथे याचा अर्थ फुटबॉलशी संबंधित आहे) मारण्यासाठी स्वागत. त्याचं काय आहे की, फुटबॉलचा वर्ल्डकप सुरू झाल्यापासून आपल्याकडे वातावरण कसे पार फुलबॉलमय झाले आहे. त्यामुळेच तर फुटबॉलची चर्चा म्हणजेच "गोल'गप्पे मारण्यासाठी आम्ही आतूर झालो आहोत. पावसाळ्यात जसे अचानक बेडकांची उत्पत्ती होऊन त्यांचा "डराव डराव' आवाज येऊ लागतो, तसेच फुटबॉलचा वर्ल्डकप सुरू झाला की, आपल्यालाही फुटबॉल हा जागतिक नंबर वन खेळ असल्याचा साक्षात्कार होऊन तोंडून "गोल गोल' असे चित्कार बाहेर पडू लागतात. तसा तर आमचा आणि फुटबॉलचा संबंध "मिस्टर इंडिया' या जुन्या चित्रपटातील "दे दे...दे दे सायबा, फुटबॉल वापस मुझे' या पॅरोडी गाण्यापासूनच आला होता. ते गाणे ऐकल्यानंतर आम्ही सातत्याने फुटबॉलवर संशोधन करीत राहिलो. पुढे पुढे "मॅराडोनाने किती "रन' काढले' किंवा सचिन तेंडुलकरने किती "गोल' केले, अशा चौकशा करेपर्यंत आमचे ज्ञान वाढत वाढत गेले. पेले, मॅराडोना, डुंगा, झिनेदिन झिदान, रोनाल्डो, रोनाल्डिनो अशी नावे नंतर आमच्या जिभेवर सहज विराजमान झाली. "ब्राझील... ब्राझील...' या वेंगाबॉईजच्या गाण्याने भारतीयांना लग्नसराईत नाचताना किती साथ दिली हे वेगळे सांगायला नको. याकडेही आम्ही लक्ष ठेवून होतो. यंदाचा फुटबॉल वर्ल्डकप सुरू झाला आणि याबाबतीत आम्ही स्वतः भारतीयांना फुटबॉल म्हणजे काय वाटते, त्यांना कितपत समजते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या काही संकलित प्रतिक्रिया थोडक्‍यात अशा -

- फुटबॉल हा खेळ कालच पाहिला. त्यावरून जगभरात किती दारिद्य्र आले याची कल्पना येते. चक्क अकरा खेळाडू एका फुटबॉलच्या मागे अख्खे नव्वद मिनिटे लागले होते, याला काय म्हणावे? काय म्हणता "पीजे पीजे'... पीजेच तर सांगायचा होता.

- मला उद्‌घाटनाच्या सामन्यातील काय आवडले असेल तर शकिराचा डान्स. वा क्‍या बात है... आता मात्र फुटबॉल संपेपर्यंत काही समजले नाही तरी सामन्यांवर लक्ष ठेवावेच लागेल. काय करणार... ऑफिसमध्ये आपण किती फुटबॉल तज्ज्ञ आहोत हे दाखवायला तेच तर कामाला येणार आहे.

- भारतीयांनी फुटबॉलच्या नादी लागू नये. आपण आपले क्रिकेट खेळलेलेच बरे. फुटबॉल आपल्या तब्येतीला मानवणारे नाही. त्यात सारखे 90 मिनिटे इकडून तिकडे आणि तिकडून इकडे पळापळ करावी लागते. नुसता घाम गाळावा लागतो. अन्‌ एवढे करून गोल किती होतात एक ना दोन! आताच्या क्रिकेटपटूंना तरी ट्‌वेंटी-ट्‌वेंटीमुळे बरीच पळापळ करावी लागते, आधी तर कसोटीत पाच-पाच दिवस आरामशीर खेळ चालायचा. आताही फिल्डरच्या वाट्याला केव्हा तरी चेंडू येतो एवढेच. आणि "अंदरकी बात' म्हणजे यात आपले दहा-बारा संघात सहज "शेर' होता येते. फुटबॉलमध्ये शंभरावर देशांशी कोठे "डोके' (हेडर) लावायचे?

- क्रिकेटमध्येही फुटबॉलप्रमाणेच "कार्ड' दाखविण्याची पद्धत सुरू करायला हवी. अमोशा-पौर्णिमेला खेळणारा युवराज नीट नाही खेळला की, त्याला "गुलाबी' कार्ड दाखवायचे (अर्थात अंपायरने). त्यामुळे त्याला थेट क्रिकेट सोडून "बॉलिवूड'मध्ये काम करणे सक्तीचे होईल. धोनी-सचिनने विकेटा फेकल्या की त्यांना "मनी कार्ड' दाखविले जावे. त्यामुळे त्यांच्या जाहिरातीच्या पैशांतून तत्काळ कपात होईल, अशी व्यवस्था करावी इ.इ.

तर मित्रांनो, वरील संकलित प्रतिक्रिया वाचून तुमच्या फुटबॉलच्या ज्ञानात भर पडली असेल असे आम्ही मानतो. फुटबॉल जरूर पहा पण आपला मुख्य खेळ क्रिकेट आहे हे विसरू नका म्हणजे झाले!
 
("सकाळ'मध्ये प्रसिद्धी तारीख ः 13 जून, 2010)

Sunday, May 30, 2010

मान ना मान, मै तेरा महेमान...

आता तुमचे "मन का रेडिओ'... 172.0 एफएमवर... कोणत्या तोंडाने स्वागत करावे, असा प्रश्‍न आम्हाला पडला आहे... त्यासाठी सज्जड कारणही आहे. मुख्य कारण म्हणजे तापमान. "मान ना मान, मै तेरा महेमान' असे म्हणत तापमानाने सर्वांची पार वाट लावली आहे. "मन का रेडिओ'च्या या नॉनएसी स्टुडिओत सध्या तापमान फोर्टी प्लस आहे. त्यामुळे आता येथील वातावरण कसे असेल हे सांगण्याची तशी गरज नाही, तरी आम्ही सांगणारच आहोत, हे तुम्ही ओळखलेच असेल. तर स्टुडिओतील कर्मचारी काम करताना दिसताहेत, पण ते वास्तविक डोळे उघडे ठेवून झोपी गेलेले आहेत... दुपारच्या जेवणामुळे त्यांची अशी अवस्था झाली आहे...काही जण घरीच आराम फर्मावत आहेत आणि ऊन कधी कमी होईल याची वाट पाहत आहेत... विशेष म्हणजे "झिरो लोडशेडिंग' जाहीर असले तरी सर्वांना लोडशेडिंगचा सराव कायम राहावा या उद्दात हेतूने महावितरणमध्ये मध्ये वीज गुल करते. त्याचा परिणाम म्हणून स्टुडिओतील पंखे श्रद्धांजलीसाठी जसे स्तब्ध उभे राहतात अगदी तस्से उभे आहेत... त्यामुळे स्टुडिओतील पाली, उंदरे आदी तत्सम प्राणी, त्यांना काही कळत नसल्यामुळे "जरा पंखा लावा की राव...' या मुद्रेने कर्मचाऱ्यांकडे टक लावून पाहत आहेत... तशात आमचे बातमीदार बंडू भांडाफोडकर धापा टाकतच स्टुडिओत प्रवेश करीत आहेत. त्यांना मुळीच बोलता येत नाहीय... ऊन दुसरे काय? त्यांच्या इशाऱ्यांवरूनच त्यांनी उन्हामुळे त्रस्त झालेल्या काही नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया आणल्याचे स्पष्ट झाले. त्याच प्रतिक्रिया देऊन आजचे प्रक्षेपण थांबवावे लागणार आहे. तर वाचा प्रतिक्रिया...

नागरिक नं. 1 ः कडक उन्हामुळे पाण्याची फार बोंब झालीय हो! नळाला पाणी आले की, दरदिवशी मोटारसायकल, घराच्या बाह्य भिंती नळी लावून मस्तपैकी धुऊन काढण्याचा माझा नियम होता, पण आता... नळाला पाणी येते 20 मिनिटे आणि त्यात वीज मोटार पकडणाऱ्यांची गस्त. त्यामुळे "मोटार लावा, मोटार काढा' यातच वेळ जातो.

नागरिक नं. 2 ः घरी एवढे उकडेतेय की, त्यापेक्षा ऑफिसमध्ये बरे. तेथे निदान झोपा तरी काढता येतात. एरवी आम्ही वर्षभरही तेच करीत असतो. त्यामुळे त्याचा सरावही आहे! घरी झोपच लागत नाही.

नागरिक नं. 3 ः आमच्याकडे पाच दिवसाला एकदा पाणी येते... तेही टॅंकरने. शेजारच्या गल्लीतील नागरिक आणि आमच्या गल्लीतील नागरिक असे एकदमच त्यावर हल्ला करून आम्ही त्या पाण्याचा फडशा पाडतो. अर्थात अर्धे पाणी रस्त्यावरच वाहून जाते, हा भाग वेगळा.

नागरिक नं. 4 ः महावितरणचे आभार जेवढे मानावेत तेवढे कमीच आहेत. एक तर उन्हाळ्याचे दिवस... त्यात आंब्याच्या रसावर मस्त ताव... वर थंडगार सरबत. थंडगार कूलरची हवा... काय होणार? ढेरी बघा कशी चंद्रकलेप्रमाणे वाढू लागली होती; पण महावितरणने मध्येच वीज गुल करण्याची शक्कल लढविली आणि दुपारच्या झोपेचे पार खोब्रे झाले. थोडे रागाने बोललो असे वाटले असेल तर महावितरणची मी माफी वागतो; पण त्यांनी जे काही केले ते नागरिकांच्या भल्यासाठीच ना? आज ना उद्या पुन्हा आपल्याला लोडशेडिंगशी टक्कर घ्यावीच लागणार आहे. मग विजेवाचून राहण्याचा सराव तुटायला नको. त्यासाठीच त्यांचा हा उपाय मला फार आवडला. ढेरीही लेव्हलला आली.

नागरिक नं. 5 ः आता पावसाची प्रतीक्षा आहे... कधी येईल कोण जाणे... दरवर्षी सुरुवात तर चांगली करतो, मग कोठे गायब होतो... असो. आता दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यात वृक्षारोपणाचे फॅड सुरू होईल. "एक झाड, एक फोटो, एक वर्षाने पुन्हा एक खड्डा... त्याच खड्ड्यात पुन्हा पुढच्या वर्षी वृक्षारोपण... पुन्हा पाणीटंचाई, वीजटंचाई, त्यावरून मारामाऱ्या इ...इ...

("सकाळ'मध्ये प्रसिद्धी तारीख ः 30 मे, 2010)

Friday, May 28, 2010

चिअर गर्लचा चित्कार अन्‌ लाईव्ह शो!

वेलकम बॅक टू मन का रेडिओ, 172.0 एफएमवर. क्‍या बात हैं भई, क्रिकेट का मोसम शुरू हो गया है, आयपीएलच्या मस्त मॅचेस पाहून तुमची तबियत खूश झाली असेल. पण आता एवढ्यावरच थांबण्याची गरज नाही. अहो, आता तर थेट थिएटरमध्येच आयपीएलच्या मॅचेस लाईव्ह दिसणार आहेत म्हणे! देशभरातील 1000 मल्टीप्लेक्‍स थिएटरमध्ये हे सामने दिसणार आहेत. पण मंडळी, आता त्यावरही समाधान मानण्याचे कारण नाही, कारण हे सामने थिएटरमध्ये जाऊन पाहताना तुमच्या कानावर "चिअर गर्ल्स'चे चित्कार ऐकू येणार आहेत! म्हणजे पडद्यासमोर असते ना त्या छोटेखानी स्टेजवर खरोखरच्या चिअर गर्ल्स अवतरणार आहेत. तशी व्यवस्थाच करण्यात आली आहे. तिकडे कोणी चौकार-षटकार मारले की, इकडे या चिअर गर्ल्स अंगात आल्यासारखे लाईव्ह नाचणार म्हणे! असो. तर या नव्या फंड्याच्या पार्श्‍वभूमीवर वाचूया एक गाणे...

चिअर गर्ल आली...
मुंबापुरीहून आली...
असं काय नाचता,
तसं काय नाचता...

आता हे नवे तंत्रज्ञान आल्यामुळे पुढे आपल्याला काय काय लाईव्ह करता येऊ शकेल, यावर "मन का रेडिओ'च्या एक्‍स्पर्ट टीमने लगोलग संशोधन करून टाकले आहे. ते असे ः

"सासू पण कधी सून होती...' लाईव्ह ः यामध्ये या सिरिअलचे थेट लाईव्ह प्रक्षेपणच करता येईल. तिकडे सासूने सुनेच्या (किंवा व्हाईस व्हर्सा, असेही होते बरे का आजकाल!) कानाखाली आवाज काढला की, इकडे स्टेजवर बसलेल्या काही बायका मोठमोठ्याने "रुदाली'सारख्या रडायला लागतील. किंवा तिकडे सिरिअलमधील बायकांचे (नागिनस्टाईलचे गंध वगैरे लावलेल्या) कटकारस्थान शिजू लागले की इकडे स्टेजवरील बायका आपापसात कुजबुजू लागतील. मध्येच "चक चक, अरेरे फार वाईट झाले' असे बॅकग्राउंड म्युझिक तयार करतील. कोण मेले, कोणाचा दुसरा अवतार सुरू झाला, कोणी मरून अचानक परतले की, त्या त्या सिच्युएशननुसार स्टेजवर आपल्याला लाईव्ह फिल देण्यासाठी जे काही करावे लागेल ते करता येईल.

लाफ्टर शो लाईव्ह ः आता असेही लाफ्टर शोचे एवढे पीक आले आहे की, थिएटरमध्ये जाऊन कोण पाहणार असे वाटेल; पण तसे नाही. त्याला "लाईव्ह'ची साथ असल्यामुळे ते फार रंगतदार होतील. तिकडे पडद्यावर कोणी लाईव्ह बाष्कळ विनोद सांगितला की, इकडे खाली बसलेले शे-दोनशे माणसं मोठमोठ्याने हसायला लागतील. आता अशी हसण्याची कॅसेट लावता आली असती; पण समोर साक्षात लाईव्ह लोक हसताहेत म्हटल्यावर पाहणाऱ्यालाही आपोआपच हास्य योग संघात आल्यासारखे वाटेल अन्‌ त्यालाही नसलेल्या विनोदावर हसू फुटेल. यातून दोन गोष्टी साध्य होतील. मनोरंजन ते मनोरंजन होईल वर हसण्याचा व्यायाम फ्री!

दहावी-बारावी परीक्षा लाईव्ह ः आता ही एकदम ब्रॅंड न्यू कल्पना आहे. दहावी-बारावी परीक्षेचा पेपर सुरू असतानाचे जे काही प्रकार होतात ते लाईव्ह पाहणे म्हणजे एक लाईफटाईम कार्यक्रम पाहिल्याचा आभास प्रेक्षकाला होणार आहे. परीक्षा केंद्रावर आपल्या पाल्याच्या मदतीसाठी हातात कॉप्या घेऊन तत्पर असलेले पालक, पोलिस आणि कॉप्या पुरविणाऱ्यांचा पाठशिवणीचा खेळ, केंद्रावरील कर्मचारी यांचे परीक्षार्थींना सहकार्य, काही धाडसी विद्यार्थ्यांचे सुपरमॅन, जेम्स बॉंडप्रमाणे खिडक्‍यांतून कॉप्या पुरविणे हे सर्व लाईव्ह सुरू असताना इकडे स्टेजवरही साधारणतः तसाच गोंधळ सुरू ठेवता येईल. विशेष म्हणजे त्यात प्रेक्षकांनाही सहभागी होता येईल. तज्ज्ञ कॉपी पुरवठादारांना आपली मते "साईड बाय साईड' मांडता येईल. एकूणच "एकमेकां साह्य करू, अवघे परीक्षा पास करू' हे ब्रीद सार्थ ठरेल.

(या आयडिया "मन का रेडिओ'तर्फे सर्वांसाठी फ्री आहेत. कोणीही याचा वापर करू शकतो).

("सकाळ'मध्ये प्रसिद्धी तारीख ः 14 मार्च, 2010)

मुन्नाभाईचे मनोगत

वेलकम बॅक टू मन का रेडिओ... 172.0 एफएमवर आपले स्वागत आहे. जगातील लेटेस्ट आणि सर्वाधिक क्रांतिकारी घटना नुकतीच घडली आहे, ती सुद्धा भारतात नव्हे नव्हे महाराष्ट्रात... नव्हे मराठवाड्यात... चक्क उमरगा तालुक्‍यात गुंजोटी येथे! तेथील विद्यार्थ्यांनी त्यांच्याविरुद्ध होणाऱ्या "अन्याया'विरुद्ध बापूंच्या अहिंसात्मक आंदोलनाला साजेसा उपक्रम अर्थात ठिय्या देऊन आवाज उठविला. सगळीकडे सर्रास कॉप्या सुरू असताना आम्हाला कॉपी करू देत नाहीत, म्हणजे काय? असे म्हणत विद्यार्थ्यांनी चक्क परीक्षा केंद्रात जाण्यास नकार दिला. तब्बल अर्धा तास निषेध नोंदवून मग विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. असा हा जागतिक ऐतिहासिक लढा महाराष्ट्रात झाला. यावर बापूंचे भक्त मुन्नाभाईंना (एमबीबीएस) मनोगत व्यक्त करण्याचा, थेट बापूंशी संवाद साधण्याचा मोह अनावर झाला नाही, तरच नवल. आणि त्याला "मन का रेडिओ' सारखे व्यासपीठ कोठे मिळणार... तर वाचूया या विषयावर मुन्नाभाई एमबीबीएसचे मनोगत, थेट बापूंशी संवाद...ऑन एअर...

मुन्नाभाई ः प्रणाम बापू... क्‍या सब ठिकठाक हैं ना... मुन्नाभाई एमबीबीएस पिक्‍चरके बाद पहिलीच बार रेडिओ पे बोल रहा हूं. गुंजउठी (गुंजोटी) गॉंव के बच्चे लोगों नें आपके स्टाईल से आंदोलन किया. मेरा तो भेजाच नहीं चलरेला हैं. सर्किटका तो पुरा सर्किटीच डॅमेज हो गया हैं. आजकल के बच्चे लोगों को क्‍या हो गया... कुछ समज नहीं आता. क्‍या बोलते मालूम उधर कॉपी चलरेली तो इधर क्‍यूं नहीं. आता बापू सवाल एकदम सहीं है पर कल ये बोलेंगे वो चोरी कर रहां है, तो मैं क्‍यूं न करूं! आता हे बरोबर आहे का, तुमीच बोलो! अब सर्किट और मैने पिक्‍चरमें किया वो एकदम गलत था, सब रॉंग था. अब ये बच्चे लोंगों का सिक्रेट मेरे को मालूम. सालभर ये घूमेंगे, फिरेंगे, ऐश करेंगे और क्‍या! पेपर जवळ आला की, मग पुस्तक घेऊन बसणार. पुस्तकातलं भेजात घुसलं नाही तर पुस्तकाचे पोस्टमार्टेम करून कॉप्या करणार. वर कॉपी नाही करून दिली तर ठिय्या देणार. वा रे वा... मैं क्‍या बोलता ऐसे बच्चों को करने दो ना कॉपी. उनके सामने रख दो किताब... लेकिन स्टडीच नहीं किया तो ऍन्सर कहॉं से मिलेगा! ढूँढते रहे जाएंगे... टाईम खतम और फिर फेल! अगर कॉपी करके पास भी हुए तो "इडियटी'च रहेंगे ना. उनका तो "ऑल इज वेल' होनेवालाच नहीं. बापू... तुमीच समझाओं ना इनको. मेरा तो भेजाफ्राय होगया... सर्किट किधर हैं तू... गाडी निकाल रे बाबा...

("सकाळ'मध्ये प्रसिद्धी तारीख ः 21 मार्च, 2010)

ईश्‍वरजी हाजीर हो...!

वेलकम बॅक टू मन का रेडिओ... 172.0 एफएमवर! आजच्या दिवशी आजचाच "मन का रेडिओ'चा एपिसोड प्रसारित व्हावा, ही तो ईश्‍वराची इच्छा! आता ही काय नवीन भानगड असे अनिच्छेने पाहू नका. त्याचं काय आहे, आजचा कार्यक्रम "व्हीव्हीएस' (व्हेरी व्हेरी स्पेशल, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण नव्हे!) आहे. आज "मन का रेडिओ'मध्ये भरलीय "मन की अदालत'. यामध्ये तुमचा आवडता आरजे पद्या त्याच्या "मना'ला वाट्टेल ते प्रश्‍न विचारणार आहे आणि तेही थेट ईश्‍वराला! अरे बापरे, एवढी एक्‍स्कुझिव्ह बातमी एवढ्या सहजतेने आम्ही सांगितल्याबद्दल आम्हालाच आश्‍चर्य वाटत आहे. असो. "मन की अदालत'मध्ये आम्ही थेट ईश्‍वरालाच पाचारण करण्याचे कारण म्हणजे नुकतीच एका आश्रमात झालेली चेंगराचेंगरी आणि त्यासाठी जबाबदार धरण्यात आले ते थेट ईश्‍वरालाच! ""आश्रमातील व्यवस्था चोख होती; पण काय करणार ईश्‍वरच चेंगराचेंगरीला जबाबदार आहे,'' असे आश्रमाच्या प्रवक्‍त्याने सांगितले म्हणे! त्यामुळेच तर ईश्‍वर आहे असे समजून आम्ही ही अदालत बोलावली आणि तसेच कोणी तरी आलेही. त्यातून इतर काही समस्यांचाही उलगडा होऊ शकेल. तर वाचूया "मन की अदालत'... 172.0 एफएमवर...

(श्रीमानजी ईश्‍वरजी हाजीर हो... अशी हाळी... त्यानंतर अचानक झगमगाट होऊन, ईश्‍वरासारखे कोणी तरी खुर्चीवर स्थानापन्न झालेले दिसतात. त्यांच्या हातात माईक देण्याचा प्रयत्न स्पॉटबॉय करतो, पण ईश्‍वरजी "चुटकी' वाजवतात आणि त्यांच्या हातात आपोआप माईक येतो. पुढे...)

- ईश्‍वरजी आपले "मन की अदालत'मध्ये स्वागत. आपल्यावर आरोप आहे की, सदर आश्रमात झालेल्या चेंगराचेंगरीला आपणच जबाबदार आहात. आपण ही जबाबदारी घेता काय?

ईश्‍वर ः अरे बाबा, ही काय एखाद्या स्फोटाची जबाबदारी घेण्यासारखे सोप्पे आहे का? आपली कोणतीही संघटना उठते आणि घेते जबाबदारी! आय हॅव टू चेक ऑल इन्सिडेन्स. आमच्या रेकॉर्ड विभागाला याबाबतीत चौकशी करण्यास आम्ही सांगितले आहे. सत्यशोधन समितीही स्थापन झाली आहे. तिचा अहवाल येताच या घटनेला जो कोणी जबाबदार असेल, त्याला कडक शासन करण्यात येईल.

- असे असले तरी तुम्हाला ही जबाबदारी झटकता येणार नाही. ही घटना झालीच कशी?

ईश्‍वर ः त्याचं काय आहे, की आजकाल भक्तांची संख्याच एवढी वाढली आहे की, विचारू नका! त्यांच्या मागण्या, अपेक्षाही प्रचंड वाढल्या आहेत. कोणाला डॉक्‍टर व्हायचंय, कोणाला इंजिनिअर, कोणाला प्रेमात यश हवं आहे तर कोणाला नोकरी! (तरुण भक्तांची संख्या वाढण्याची ही दोन कारणे असावीत). आता या सर्वांची पूर्तता करावीच लागते. शेवटी "इमेज'चा प्रश्‍न आहे. आपल्या समस्या सोडविण्यासाठी लोकांनी कोणालाही "मध्यस्थ' न ठेवता थेट माझ्याशी कॉंटॅक्‍ट केला तर वरील प्रकारच्या घटना टळतील. माझा कॉंटॅक्‍ट नंबर मी थोड्या वेळात देतो.

- देशातच नव्हे तर जगात भ्रष्टाचार बोकाळलाय, अनीती वाढली आहे, अन्याय-अत्याचार वाढले आहेत. आपले काय म्हणणे आहे?

ईश्‍वरजी ः तुम्हाला देशाचे पाहिजे की जगाचे? एकच काही तरी सांगा. माझ्याकडे बिल्कूल वेळ नाही. बी स्पेसिफिक.

- ओके, सर. फक्त भारताविषयी सांगा.

ईश्‍वरजी ः आता प्रत्येक गोष्टीला मीच जबाबदार आहे, असे तर तुम्हाला म्हणायचे नाही ना? कोणतेही काम करायचे असेल तर संबंधिताला पैसे चारण्यासाठी तुम्हीच आधी तयार असतात. त्याला मी काय करणार? आपले काम टाळून ते दुसऱ्याच्या गळ्यात कसे बांधायचे, यात तर मानवजमात "एक्‍स्पर्ट'! त्यामुळेच इतरांवर अत्याचार होतो. आता हे करायला मी सांगतो की काय? एकूणच हा मानवप्राणी फारच अवघड झाला आहे. त्याला कंट्रोल करण्यासाठी काय करावे, यावर आमच्याकडे आता विशेष चर्चासत्र आयोजित केले आहे. त्यातून नक्कीच काही तरी ठोस येईल. तुम्हाला यायचे का चर्चेसाठी "वर'? करू का व्यवस्था?

- सॉरी, सर. तुम्ही दिली तेवढी उत्तरे खूप झाली. आल इज वेल, आल इज वेल... आजची "मन की अदालत' येथेच संपवूया. तुमचा कॉंटॅक्‍ट नंबर आमच्या वाचकांसाठी द्या ना...

(ईश्‍वरजींनी दिलेला 50 आकडी कॉंटॅक्‍ट नंबर पृथ्वीतलावरून लागणे शक्‍य नसल्याने तो देता येत नाही. श्रद्धाळूंनी तो स्वतःच शोधावा, नास्तिकांनी सोडून द्यावे. क्षमस्व.)

("सकाळ'मध्ये प्रसिद्धी तारीख ः7 मार्च, 2010)

Wednesday, May 26, 2010

रंग बरसे भीगे चुनरवाली,रंग बरसे, होली हैं...

वेलकम बॅक टू "मन का रेडिओ', 172.0 एफएमवर. आज होळी, उद्या धूळवड. तशी तर आजच तुमची धूळवड सुरू झाली असेल नाही? आमची तर सुरू झाली बुवा. त्याचं काय आहे, "मन का रेडिओ'वर आयोजित खास "बोंब मारो बोंब' कार्यक्रमामुळे येथे वातावरण कसे "रंगी'न झालेले आहे. आता हा रेडिओ असल्यामुळे तुम्हाला आमची तोंडं किती आणि कशी रंगली हे कळणार नाही; पण सुरवातीला ऐकविलेल्या गाण्याने एकूणच माहौल कसा असेल कळलेच असेल, तर "बोंब मारो बोंब' कार्यक्रमात आपले स्वागत. या लाईव्ह कार्यक्रमात काही नामांकितांनी धूळवड कशी साजरी केली याचा "आँखो देखा कानो सुना' हाल, तुम्हाला वाचायला मिळणार आहे. तर वाचा...सर्वात प्रथम एक उत्तरभारतीय आमदार काय गाणे म्हणताहेत ते हळूहळू ऐकू येऊ लागले आहे... बोल एकदम अस्पष्ट आहेत... आजूबाजूला सुंदर सुंदर ललनांचा घोळका "डान्स' करीत आहे. गाणे आता स्पष्ट ऐकू येऊ लागले आहे...

अरे पैसा पैसा क्‍या करती है,
पैसों का मैं ढेर लगा दूं
जो तू हो जाए मेरी....

यावर सदर विधायकाने जो काही डान्स केला असेल तो लिहिणे अवघड आहे. पाहणे तर त्याहून अवघड. आता पुढे जाऊ या. इथे पोस्ट मास्तर जनरल असे फारच "जनरल' वाटणारे पद भूषविणारे एक महाशय काय म्हणतात ते पहा -

दे दे मुझे तू घूस
दो कोटी बारा आणा,
मारे गा भैय्या ना ना!

आता या "जनरल'चे उर्वरित दिवस हवालातमध्ये जावोत, अशा शुभेच्छा देऊन पुढे सरकू या. अरेच्चा इथे हा कोण बसलाय वस्तूंची मोजदाद करीत? कल्याण-डोंबिवलीतला अधिकारी दिसतोय... एक जबरदस्त फ्लॅट, त्यात बाथरूम... बाथरूम म्हणजेच एक स्वतंत्र फ्लॅट... सहा प्लाझ्मा टीव्ही, 100 पॅंटी, 150 शर्ट, 50 टीशर्ट... इ. इ. त्याचे हे बडबडगीत...

""अरेरे.... किती कष्टाने... किती लोकांच्या मुंड्या मुरगळून हे पैसे जमविले होते रे... कोणा नतदृष्टाची दृष्ट लागली रे... सगळे गेले रे... बुरा ना मानो होली है रे...''

पुढे सरकूया... इथे तर शतकातील सर्वात महान क्रिकेटपटू बिस्किटे खात बसलाय. त्याला काही विचारले तर तो म्हणतो, "मेरा दोस्त आनेवाला हैं, मेरा दोस्त आनेवाला हैं. आप भी हो सकते हैं...' तो फक्त एवढे म्हणतानाच हसतोय. इतर वेळी मात्र गप्प. एकदम चिडिचिप. अरे बाबा आता महाराष्ट्र शासन तुझ्यासाठी "म्युझ्यम' बांधणार, तुझ नाव "भारतरत्न'साठी सुचविणार एवढे सांगितले तरी हा सिरिअसच. होली है... म्हंटले तरी सिरिअसच. त्याला विचारले तर तो म्हणाला, ""बॉईज प्लेड वेल. मी पण प्लेड वेल. पण मी आता दोनशे काय मारले सगळ्यांना मी महान असल्याचा साक्षात्कार झालाय. इतके दिवस मला नावं ठेवायचेत. सेंच्युरी झाली की आऊट होतो म्हणून.''

"मग ते काय खोटे होते?' असे म्हणून कोणी तरी या महान क्रिकेटपटूवर रंग टाकला अन्‌ लंपास झाला. बुरा ना मानो... होली हैं...

("सकाळ'मध्ये प्रसिद्धी तारीख ः 28 फेब्रुवारी, 2010)