मेकिंग ऑफ "मन का रेडिओ'...

एखादा चित्रपट चांगला हिट वगैरे झाला की, त्याचे "मेकिंग ऑफ अमूक-अमूक' सादर करण्याचा प्रकार असतो. त्यात मग तो चित्रपट कसा तयार झाला याची इत्यंभूत माहिती असते. हा "मेकिंग' एखाद्या शॉर्टफिल्मच्या स्वरूपात असू शकते किंवा एखादे पुस्तकही छापले जाऊ शकते. आमचा "मन का रेडिओ' हा काय प्रकार आहे, असा प्रश्‍न अनेकांना पडला असेल. त्यांना सोयीचे जावे म्हणूनच हे "मेकिंग ऑफ मन का रेडिओ'चे विशेष पान.

ताज्या घडामोडींचे खुसखुशीत सादरीकरण करावे आणि तेही थोडे नव्या "फॉर्म'मध्ये असे वाटले आणि त्यातूनच जन्म झाला "मन का रेडिओ'चा. रोज माझ्या घरात सकाळी-सकाळी एकीकडे कामे सुरू असताना एका बाजूला रेडिओ आपली कामगिरी बजावत असतो. पूर्वी साधा रेडिओ होता, आता एफएम रेडिओने त्याची जागा घेतली. पूर्वी कर्णमधूर गाणी ऐकू यायची आता धांगडधिंगा. पण नवे ते सगळे वाईट आणि जुने ते सगळे सोने, असे कसे म्हणायचे? त्यामुळे नव्यातील चांगली ऱ्हिदमची गाणी थोड्या काळासाठी का होईना कधी कधी आवडून जातात. असेच ऐकता ऐकता एफएम रेडिओवरील ताज्या दमाच्या "आरजें'ची स्टाईल तेवढीच लाईव्ह वाटली. "मन को रेडिओ' लिहिताना त्याचा वापर केला. रेडिओवर जे जे होते, ते ते लेखी स्वरूपात घेण्याचा प्रयत्न केला.

लेखाची सुरुवात सहसा "वेलकम बॅक टू मन का रेडिओ... 172.0 एफएमवर आपले स्वागत आहे' अशा शब्दांनी होते. यातील "172.0 एफएम' हे कोठून आले? हा आहे इंटरनेटशी संबंधित सर्व्हर नंबर! त्याचाच आम्ही एफएम रेडिओ करून टाकला.

याबाबत झालेला एक किस्सा सांगण्यासारखा आहे. एकदा फोनवरून "मन का रेडिओ'चे डिक्‍टेशन देता-देता टाईप करणाऱ्या ऑपरेटरने त्याचा मोबाईल स्पिकर ऑन ठेवला. त्यामुळे शेजारच्या ऑपरेटरचा गैरसमज होऊन त्याने चक्क आपल्या मोबाईलवर 172.0 सेट करून पाहिले पण आवाजाचा पत्ताच नाही! त्याने मग दुसऱ्या एका "तज्ज्ञा'ला विचारले त्याने सांगितले "अरे हा रेडिओ नवा असेल, अजून लॉंच झाला नसेल!' शेवटी हा रेडिओ फक्त लेखी स्वरूपातील असून तो दर रविवारी औरंगाबाद "सकाळ'मध्येच वाचायला मिळेल, असे स्पष्ट करावे लागले.

"मन का रेडिओ'साठी विषय निवडताना तो ताजा असावा ही पहिली प्रायॉरिटी. कधी-कधी विषयच सापडत नाही. कॉम्प्युटरचा शोध मानवी "डोके' लक्षात घेऊनच लागला असणार. त्यामुळेच कधी कधी आमचेही डोके कॉम्प्युटरप्रमाणेच हॅंग होते. मग काय सहकाऱ्यांनी नुसता विषय सुचविला की आपोआपच "मन का रेडिओ'चे प्रक्षेपण पुन्हा सुरू होते... "हॅंग'ओव्हर उतरल्यासारखे... तुम्हीही सुचवून तर पहा एखादा विषय... "मन का रेडिओ' ऑन डिमांड... शक्‍य झाले तर त्यावरही होऊ शकतो एखादा "मन का रेडिओ'चा भाग...