Thursday, April 29, 2010
जगातील पहिला लेखी रेडिओ!
वेलकम टू "मन का रेडिओ'... 172.0 एफ.एम! आपका अपना आरजे पद्या आपका स्वागत करता हैं. मंडळी, आपल्यासाठी हा जगातील पहिला लेखी स्वरूपातील रेडिओ सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. पडलात ना बुचकळ्यात? पण मंडळी, एकदम सोप्पं आहे. "मन का रेडिओ' तुम्हाला दर आठवड्यातील महत्त्वाच्या घडामोडींची बित्तंबातमी आपल्या खास रेडिओ स्टाईलने देणार आहे. "मन का रेडिओ' तुमच्या मनाचा ठाव घेईल. कधी हसवेल, तर कधी रडवेल... कधी पोटात गुदगुल्या करील, तर कधी डोळ्यांच्या पापण्या ओल्या... सो, हो जाओ तय्यार... हर हप्ते पढते रहो... पढते पढते "लव्ह' हो जाए...!
तो बहेनो और भाईयों... आजकल जिधर-उधर म्हणजेच जिकडे-तिकडे एकच चर्चा महागाई... महागाई... "गावडी हो...' असे करून या महा"गाई'ला पल्याला हाकलताही येत नाही, अन् "ये... ये...' करून गोड पोळीचा घासही भरविता येत नाही. कारण गोड पोळी टाकायला साखर आणायची कोठून? "साखरेचे खाणार, त्याला देव देणार' असे म्हटले जाते. देव असलाच तर ते खरेही असेल, पण मंडळी साखरेचे दर पाहून आजकाल "साखरेचे खाणार, त्याला मधुमेह होणार' असे लोक म्हणू लागले आहेत. असो. इस बात पर हो जाए एक गाना...
आजा आजा शक्कर छोडे,
जम गया तो एखादी बॅंक फोडे,
कोई तो "गुड'लक निकाले,
सस्ते में मिले वो खा ले...
ढॅंटाढॅं...ढॅंटाढॅं...!
आप पढ रहे हैं, "मन का रेडिओ'. पढते रहो.. पढते पढते... मंडळी आता जे गाणे आपण वाचले ना ते नुसते वाचूनही घशाला कोरड पडलीय. काय घसा घरवडून गाणे गायिले नाही? असो. आपण चर्चा करीत होतो महागाईची. तर आज आपल्योसाबत आहेत, ज्येष्ठ दुकानदार मनसुखभाई. यांच्या दुकानाच्या जगभरात शाखा आहेत. त्यांनाच विचारूया, महागाईमुळे त्यांच्या धंद्याची काय अवस्था झालीय ते. मनसुखभाई तुम्हीच सांगा -
मनसुखभाई ः धंद्याचे काय विचारते बाबा? पार चौपट झाला की! फिफ्टी पर्सेंट धंदा बसला. अरे बाबा, या महागाईमुळे लोक एवढे चुंगूस झालेत की एकमेकांना एक कप चहासुद्धा पाजून नाही राहिले. मग बाकीचे तर लांबच. अख्ख्या लाईफमंदी अशी महागाई नाय पायली बुवा!
- मनसुखभाई, असे आहे तर मग सर्व मॉल्स् हाऊस फुल्लं का आहेत? लोकं एवढी विनाकारण खरेदी का करीत आहेत, हॉटेली हाऊसफुल्ल का आहेत? लोकं एवढे पोटं फुटेंपर्यंत ताव का मारीत आहेत? लग्न समारंभ एवढे धूमधडाक्यात का होत आहेत? त्यात कानठळ्या बसविणारी आतषबाजी का होत आहे? इकडे गरिबांचे काय? शेतकऱ्यांचे काय? काही कुठे ताळमेळ आहे का? द्या आता उत्तर!
मनसुखभाई ः अरे... अरे... किती बोलते. माझा इंटरव्ह्यू अन् तूच बकबक करते...! कमाल है...
- मनसुखभाई कमाल है, म्हणून तुमची सुटका होणार नाही. माझ्या प्रश्नांची आधी उत्तरे द्या. मी अँकर आहे. माझे तुम्हाला ऐकावेच लागेल. आमच्या पोलनुसार 99 टक्के लोक म्हणताहेत...
मनसुखभाई ः अरे बापरे, पळा बाबा पळा... याचे काही खरे दिसत नाही.
(मध्येच लिंक तुटलेली आहे. रेडिओचा खर्र.. खर्र.. आवाज तुम्हाला येतच असेल. उद्घोषकाचा आवाज ऐका)
- झालेल्या डिस्टर्बन्सबद्दल हमें खेद हैं. "मन का रेडिओ' नॉर्मल होईपर्यंत वाचा हे गाणे...
मुंबईसे आया मेरा दोस्त
"मनसे' सलाम करो,
रात को उससे फोकटमें खाओं पिओ...
दिन में आराम करो...
आप सुन रहें हैं, "मन का रेडिओ'... 172.0 एफ. एम. पढते रहो, पढते पढते...
ंमंडळी, "मन का रेडिओ' आता नॉर्मल झालाय. आपल्या आजच्या महागाईच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आलेल्या दुसऱ्या सहभागिता गृहिणी आहेत मंदाताई. त्या आपल्याला महागाईच्या काळात एक "कॉस्ट इफेक्टिव्ह' रेसेपी सांगणार आहेत. अर्थात नंतर त्या आपले महागाईबद्दल मतही व्यक्त करतील. तर बोला मंदाताई...
मंदाताई ः त्याचं काय आहे आज मी सांगणार आहे ती रेसिपी एकदम न्यू आहे. अल्ट्रा न्यू आहे. सर्वांत प्रथम साहित्य ः एक छोटी 10 मि.लि.ची तेलाची बाटली (ऐपत नसल्यास 5 मि.लि.ची चालेल), एक मिरची (शेजारच्यांकडून ऍडजस्ट होऊ शकते), दहा दाणे साखर (दुकानावरून आणणे शक्य नसल्यास घरात कोठे मुंग्यांची रांग दिसते का याचा शोध घ्यावा), एक बटाटा!
कृती ः सर्वांत प्रथम तवा गॅसवर ठेवावा. गॅस सुरू करावा. आधीच टायमर लावलेले असावे. तीन सेकंद होताच गॅस तत्काळ बंद करावा. त्यानंतर या तव्यावर तेलाच्या बाटलीतील एक थेंब तेल तव्यावर शिंपडावे. मग दहा दाणे साखरेपैकी पाच दाणे तव्यावर टाकावेत (पाच पुढच्या वेळेस वापरता येतील). इकडे बटाट्याचा एक पातळ काप कापावा. उर्वरित बटाटे फडक्यात गुंडाळून ठेवावेत. कापलेला बटाट्याचा काप तव्यावर गोल फिरवून घ्यावा. कडकडीत भूक लागताच हा काप पटकन तोंडात टाकावा. एवढा छान लागतो म्हणून सांगू!
- अहो बाई, कडकडीत भूक लागल्यावर पोट कसे भरणार?
मंदाताई ः मग, आजकाल तुटपुंज्या पगारात आणखी काय करणार? हवा खा, हवा. आले मोठे वाचकांना रेसिपी देणारे.
- ओके... ओके... कट इट कट इट... मंडळी, गृहिणीबाई बऱ्याच संतापलेल्या दिसताहेत, आजचा कार्यक्रम येथेच संपवूया... पुन्हा भेटूया "मन का रेडिओ'... 172.0 एफ. एम.वर... पुढच्या आठवड्यात!
Labels:
पहिले प्रक्षेपण...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
वाचून काय वाटले? मनात ठेवू नका... लगेच प्रतिक्रिया देऊन टाका...