Friday, May 7, 2010

लाच देणे-घेणे ः एक नैसर्गिक प्रवृत्ती!

लाचखोरी... खोरी टेबलाखाली,
लाचखोर निघाले...
बिनधास्त निघाले...
चारी धामी...
लाचखोरी... खोरी टेबलाखाली...

-------------
वेलकम बॅक टू मन का रेडिओ 172.0 एफएमवर आपले स्वागत करीत आहे. आता तुम्हाला हा "मन के रेडिओ' वाचण्यासाठी कोणत्याही प्रकारची लाच किंवा हिंदीत ज्याला "घूँस' म्हणतात तशी द्यावी लागत नाही, हे फारच चांगले आहे. तुम्ही आपले सवय लागली म्हणून फ्रीमध्ये वाचता. तर मुद्दा काय की, जगात आता बुहुतेक क्षेत्रे भ्रष्टाचाराने व्यापलेली आहेत आणि त्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे "लाच'! मागील काही दिवसांत आपण भारतीयांनी लाच देण्या-घेण्याचे बहुतेक सर्व विक्रम मोडीत काढले असावेत. दोन कोटी काय, काही लाख काय... काही विचारू नका. या पार्श्‍वभूमीवर नेमकी समस्या काय, हे जाणून घेण्यासाठी "मन का रेडिओ'तर्फे "लाचखोरी ः एक मानवी नैसर्गिक प्रवृत्ती ः एक चिकित्सक अभ्यास' या विषयावर डॉक्‍टरेट मिळविणारे डॉ. लाचपती यांचा भांडाफोड करणार आहेत, अर्थात मुलाखत घेणार आहेत, बंडू भांडाफोडकर...

ंबंडू (जाड भिंगाचा चष्मा सावरत) ः "मन का रेडिओ'मध्ये आपले स्वागत आहे डॉक्‍टर. डॉक्‍टरेट मिळविल्याबद्दल तुमचे स्वागत. तुमच्या पीएच.डी.चा विषय पाहता सर्वप्रथम हे डिक्‍लेअर करा की, तुम्ही ही पीएच.डी. मिळविण्यासाठी किती जणांना आणि किती लाच दिली होती?

डॉ. लाचपती ः वेल इट इज क्वाईट डिफिकल टू रिमेंबर अँड टेल... बट आजचा आपला विषय "लाचखोरी ः एक मानवी नैसर्गिक प्रवृत्ती ः एक चिकित्सक अभ्यास' यावर चर्चा असा आहे. तर त्याचं काय आहे की, आधी या विषयाबद्दल सांगतो. लाच देणे-घेणे ही एक नैसर्गिक मानवी प्रवृत्ती आहे. अगदी लहान कारट्याने भोकाड पसरले की, आपण नाही का त्याला चॉकलेट देऊन गप्प करतो; तसेच हे साधेसरळ सोप्पे आहे. माझे तर म्हणणे आहे की, आपला देश जर "लाच फ्री' राहिला असता तर आपली एवढी प्रगती कधीच झाली नसती! देशात महागाई किती वाढली आहे बघा, प्रत्येकाला वाटते आपल्याला उत्पन्नाचा एक्‍स्ट्रा "सोर्स' असावा आणि या सोसातूनच लाचेचा सोर्स निर्माण होतो आणि...

(सोर्स... सोस... सर्व डोक्‍यावरून गेल्याने बंडूने मध्येच प्रश्‍न विचारला)

बंडू ः डॉक्‍टर डॉक्‍टर... तुम्हीसुद्धा... खरोखरची पीएच.डी. मिळविलेल्या माणसासारखे डोक्‍याच्या दोन हात वरून जाणारे बोलू लागला आहात. मला एकच सांगा तुम्ही ही पीएच.डी. मिळविण्यासाठी किती जणांना आणि किती लाच दिली होती?

डॉ. लाचपती ः वेल इट इज क्वाईट डिफिकल टू रिमेंबर अँड टेल... बट तुम्ही आपल्या देशातील "गरीब' बिचाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा विचारच केला नाही. मान्य आहे त्यांना गलेलठ्ठ पगार असतो, डोक्‍यावर पंखा किंवा एसी असतो, पेन्शन मिळणार असते, कोणकोणते भत्ते असतात, काम कमी अन्‌ सुट्या जास्त असतात; पण तरीही महागाई किती वाढलीय याचा विचार कोणीच करीत नाही. आता लिव्हिंग स्टॅंडर्ड जपायचे असेल तर लाच घ्यावीच लागते. बरं, लोकांना वेळ कुठं आहे काही नियमानुसार, कायद्यानुसार करायला? ते आपले पैशांचे "पुट्टल' घेऊन तयारच असतात, झटपट काम करून द्या म्हणून. एकदा का पुट्टल मिळाले, की कामे कशी झटपट होतात हे सर्वांनाच माहिती आहे. कामे लवकर झाली, की देशाची प्रगती होते हे काय सांगायला हवे? आता लाच घेताना घ्यावयाची काळजी मी माझ्या प्रबंधात स्पष्ट केली आहे. लाच एकट्याने खाऊ नये. एक तीळ जसा सात जणांनी वाटून खाल्ला तशी लाच खावी, म्हणजे ती व्यवस्थित पचते. तिचा बोभाटा होत नाही. आता पकडले गेलेले सर्व "सन्मानिय' हे हा नियम न पाळल्यानेच पकडले गेले; पण "डोंट वरी' दोन कोटी खाताना पकडले तर काही फरक पडत नाही, बाहेर पडण्यासाठी पुन्हा तोच फॉर्म्युला आहेच की, लाच देण्याचा! एकूणच काय स्टॅंडर्ड मात्र वाढले पाहिजे. लोकांनी दोन-अडीच हजारांची लाच घेऊन लाचखोरांच्या जमातीला बट्टा लावण्याचा प्रयत्न करू नये... हाचा माझ्या प्रबंधाचा निष्कर्ष आहे. "स्वेच्छा लाचेला'... म्हणजे स्वतःहून लाच देण्यास जर एखादी व्यक्ती तयार असेल तर... त्याला कायदेशीर मान्यता मिळावी, असे मला वाटते.

बंडू ः ते जाऊ द्या हो, तुम्ही फायनल एकदाच सांगा की, तुम्ही ही पीएच.डी. मिळविण्यासाठी किती जणांना आणि किती लाच दिली होती?

डॉ. लाचपती (चिडून) ः सारखं सारखं तेच तेच काय विचारताय? आता सांगू का इथे मुलाखत देण्यासाठी मला तुम्ही किती लाच दिली होती ते!

("सकाळ'मध्ये प्रसिद्धी तारीख ः 2 मे 2010)

No comments:

Post a Comment

वाचून काय वाटले? मनात ठेवू नका... लगेच प्रतिक्रिया देऊन टाका...