वेलकम बॅक टू मन का रेडिओ... 172.0 एफएमवर आपले स्वागत आहे. त्याचं काय आहे की, नुकतेच लागलेत दहावीचे निकाल... तमाम विद्यार्थी मंडळींवर यंदा दहावी बोर्ड प्रसन्न झाले आहे. त्याआधी अख्खे शिक्षण खातेच प्रसन्न होऊन त्याने आठवीपर्यंतच्या मुलांचे कोटी कोटी कल्याण अर्थात "ऑल इज वेल' करून टाकले. म्हणजेच आठवीपर्यंत सर्वांना आधीच पास करून टाकले! यंदा तर दहावीच्या विद्यार्थ्यांना किती मार्क पडावेत याला काही घरबंध राहिला नाही. चक्क शंभर टक्के मार्क घेणारे किती तरी विद्यार्थी निघालेत! मग 97 टक्के मार्क घेणारा विद्यार्थी रडत बसलेला आढळला तर नवल नाही. आता शिक्षण खात्याच्या दररोजच्या नवनव्या धोरणांमुळे घरोघरी, ठिकठिकाणी नवनवे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. तर आजच्या एपिसोडमध्ये वाचा अशाच काही घरघरच्या, ठिकाण ठिकाणच्या कहाण्या...
घर नं. 1 ः मुलगा रुसून बसला आहे. आई-वडील त्याची धमकीवजा समजूत घालताहेत...
आई ः काय म्हणतोस ट्यूशनला जाणार नाहीस?
मुलगा ः आता कोणीच नापास होणार नाहीये... मला सांगितलंय शेजारच्या टॉमीने... मग ट्यूशनला कशाला जायचे? उगाच मला टेंशन देऊ नका. आतापर्यंत खूप छळले. सारखे आपले सकाळ, संध्याकाळ ट्यूशन, ट्यूशन.. आता ऐकणार नाही म्हणजे नाही.
बाबा ः अरे बाबा, पण आपली इतकी वर्षांची ट्यूशनची सवय कशी सुटेल. तू दुसरीला असल्यापासून तुला ट्यूशनला पाठविले. आमची हौसमौज केली नाही, पण तुला विविध ट्यूशन्स लावल्या, कशासाठी तुझ्या भल्यासाठीच ना!
आई ः ...आणि शेजारचा टॉमी त्या फेमस ट्यूशनला जातो त्याचे काय? तू ट्यूशन सोडली तर सगळे शेजारी-पाजारी, नातेवाईकांसमोर काय इज्जत राहील आमची. ते काही नाही, तू ट्यूशनला गेलाच पाहिजेस. तेवढाच चार तास आडकून पडतोस, नाही तर घरभर धिंगाणा...
घर नं. 2 (आई घरात चिंताग्रस्त बसलीय. पप्पा घामाघूम होऊन घरात प्रवेश करतात) ः
आई ः काही कळलं का?
पप्पा ः कळलं, कळलं. आंदरकी बात कळलीय. पार शिक्षण खात्यात आतपर्यंत लग्गा लावून माहिती मिळविलीय. कोणाला सांगू नकोस. फार कॉन्फिडेंशियल आहे. अगं, आठवीपर्यंतचे सर्व मुलं पास होणार, त्यांना ग्रेड मिळणार असं सांगितलंय, पण आंदरकी बात म्हणजे परीक्षा होणार, शाळा मुलांना मार्क देणार, प्रश्नपत्रिका पालकांना दाखविणार... फक्त मार्कशीटवर "ए', "बी', "सी', "डी' ग्रेड देणार.
आई ः यात काय आलं डोमल्याचं कॉन्फिडेंशियल. सगळ्या जगाला माहीत आहे ते!
एक शाळा (शिक्षक गप्पा मारत बसलेले) ः एक शिक्षक दुसऱ्याकडून गुटखा घेऊन तोंडात एका बाजूला व्यवस्थित सेटअप करून चर्चेला सुरुवात करतो...
शिक्षक नं.1 ः आरे बाबा आता हे नवीनच आलंय. म्हणे पोरांना नापासच करायचे नाही. त्यांचा कल पाहायचा. त्यांना विषय कळला की नाही, त्यावर भर द्यायचा.
शिक्षक नं. 2 ः आधी आपलं बरं होतं बाबा. पेपर काढायचा, पेपर तपासायचा. पास-नापास केले, की झंझट खतम.
शिक्षक नं. 3 ः माहितीय माहितीय किती प्रामाणिकपणे पेपर तपासत होतोत आपण... पुढंही तोच प्रामाणिकपणा कायम राहील...(एकमेकांना टाळी देतात).
असो. एकूणच या "ऑल इज वेल' धोरणामुळे झालेय काय की, विद्यार्थी पार मोकाट सुटलेत! आपल्या आई-वडिलांना जुमानेसे झालेत. पालक परेशान झालेत. काही शिक्षक नेहमीप्रमाणेच "प्रामाणिक' राहणार आहेत. खरोखरचे प्रामाणिक शिक्षक कोणत्याही सिस्टिममध्ये विद्यार्थी घडविण्याचे काम करणारच आहेत. काय म्हणता, विद्यार्थी बिचारे आता मोकळा श्वास घ्यायलेत, लगेच तुमची किरकिर झाली का सुरू? तुमचंही बरोबर आहे. ओके... येथेच संपवूया आपली ही "घर घरची कहाणी...'
("सकाळ'मध्ये प्रसिद्धी तारीख ः 20 जून, 2010)
No comments:
Post a Comment
वाचून काय वाटले? मनात ठेवू नका... लगेच प्रतिक्रिया देऊन टाका...