बहेनो और भाईयों...आप पढ रहे हैं "मन का रेडिओ' 172.0 एफएम. आता वाचा सर्वात प्रथम ब्रेकिंग न्यूज! देशभरात पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्यांत असंतोषाची लाट निर्माण झाली असून ठिकठिकाणी त्याचे पडसाद उमटत आहेत. तरुण वर्गाला आपल्या पालकांकडून मिळणाऱ्या अत्यल्प "पेट्रोल भत्त्या'वर सर्वाधिक ताण पडला असून त्यांच्याकडून हा भत्ता तत्काळ वाढविण्याची मागणी होत आहे. त्याशिवाय तरुणांना शहराच्या परिसरातील "देवदर्शन', निसर्गदर्शन करणे, "अभ्यास' सहलींना जाणे शक्य नाही, अशी भावना व्यक्त होत आहे. वेतन आयोगामुळे पगार फुगलेल्या कुटुंबांमध्येही या दरवढीमुळे संतोष संपून असंतोष पसरला असून चिंता वाढीस लागली आहे (एरव्हीही ते कधीच संतुष्ट नसतात म्हणा, पाचवा दिला की, सहाव्याचे काय? सहावा दिला की एरियर्सचे काय?), कमी पगार असणाऱ्या पतीदेवांची खरडपट्टी काढण्यात येत आहे आणि "तुम्हीच सांभाळा हे घर, मी चालले माहेरी' अशा धमक्या मिळत आहेत. या सर्व बातम्या ब्रेकिंग न्यूज नव्हत्या, तर या पार्श्वभूमीवर आमचे एक वाचक भ्रमर ढिल्ले यांनी "पेट्रोललेस वर्ल्ड' हा नवा शोध लावला असून तो खास "मन का रेडिओ' च्या वाचकांपुढेच ठेवण्याचा चंग त्यांनी बांधला आहे, ही खरी ब्रेकिंग न्यूज आहे. ही नवीन संकल्पना, शोध काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न आमची बातमीदार बंडू भांडाफोडकर यांनी अनेक वेळा केला, पण भ्रमर ढिल्ले यांनी थेट "मन का रेडिओ'वरच मन मोकळे करण्याचा हट्ट धरल्यामुळे त्यांना येथे आणण्यात आले आहे. आता वाचा त्यांनीच डिक्लेअर केलेला हा शोध...
भ्रमर ढिल्ले ः पेट्रोल भरो, जल्दी करो, मेरी गाडी कबसे खडी हैं... असे म्हणण्याची आता काहीही गरज नाही. "मन का रेडिओ'च्या वाचकांना माझा सलाम. ते फारच भाग्यवान आहेत की, त्यांना माझे संशोधन फर्स्ट टाईममध्ये थेट येथेच वाचायला मिळणार आहे. मागे एकदा रामर पिल्ले नामक मानवाने पेट्रोल तयार करण्याचा दावा केला होता. पुढे त्याचे काय झाले ते सर्वांनाच माहीत आहे. पण माझे नाव "भ्रमर ढिल्ले' आहे. माझे संशोधन शंभर टक्के सक्सेसफुल आहे. "पेट्रोललेस वर्ल्ड' ही संकल्पना प्रत्यक्षात आली नाही, तर माझे नाव बदलून टाका! तर काय की, या पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढीमुळे आपल्या नाकात दम आणला आहे. पब्लिक फार परेशान आहे. पब्लिक करीत काही नाही, दोन-चार दिवस बोंब मारती. नंतर गुमान गाडी ढकलीत पेट्रोलपंपाला लागती, पण पब्लिक फार परेशान झाली आहे. हे लक्षात घेऊन पेट्रोलची गरजच पडू नये यासाठी काय करता येईल, याचा मी विचार केला. खूप डोका खाजवला. तेव्हा कोठे उपाय सापडला. आता जगातील कोणत्याही समस्येवर दोनच उपाय आहेत... एक म्हणजे कॉम्प्युटर आणि दुसरा म्हणजे मोबाईल! आता आपल्याला एक वेळ खायला-प्यायला नसले तरी चालेल पण या दोन गोष्टी आवश्यकच आहेत. तर या दोन गोष्टींचा वापर मी "पेट्रोललेस वर्ल्ड' निर्माण करण्यासाठी करणार आहे. माणसाला पेट्रोल कशाला पाहिजे. गाडीसाठी. गाडी कशाला पाहिजे वाहतुकीसाठी, एकडून तिकडे जाण्यासाठी. मग या प्रचलित पद्धतीपेक्षा मानवाला, वस्तूंना इकडून-तिकडे जाता आले, नेता आले तर? हेच मी डोके लावले. आता पेटली का तुमच्या डोक्यात ट्यूब? न्यूटनच्या अंगावर सफरचंद पडले आणि गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. माझ्याबाबतीत तसेच झाले. मी एक पीडी.एफ फाईल तयार करून ती एका ई-मेलला अटॅच करून मित्राला पाठिविली आणि तेथेच माझ्या "पेट्रोललेस वर्ल्ड' संशोधनाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. माझे मुख्य संशोधन हेच की, जशी फाईल पी.डी.एफ. करून इकडे-तिकडे ई-मेलद्वारे पाठवितात, तसेच माणसं, वस्तू पाठविता येतील. मी एक विशिष्ट स्कॅनर तयार करीत असून त्यातून माणूस, वस्तू गेली की तिची "पीडीएफ' फाईल तयार होईल. ती ई-मेलला अटॅच केली की, जगात कोठेही पाठविता येईल! फक्त डाऊनलोड करायचे की झाले काम फत्ते! नो पेट्रोल, नो पेट्रोल दरवाढ, नो महागाई, ओन्ली पेट्रोललेस वर्ल्ड!
बंडू भांडाफोडकर ः आत्ताच तुम्ही "स्कॅनर तयारी करीत आहे', "जगात कोठेही पाठविता येईल' अशी भविष्यकालीन वाक्ये उच्चारलीत. म्हणजे तुमचे संशोधन पूर्ण झालेले दिसत नाही.
भ्रमर ढिल्ले ः फारच लवकर, काही दिवसांतच म्हणाना. हे काम होऊन जाईल.
बंडू ः परत एकदा भविष्यकालीन वाक्ये! उठा उठा येथून... नाही तर तुम्हालाच "पीडीएफ' करतो येथून...
बहेनो और भाईयों... "पेट्रोललेस वर्ल्ड'ची भाकडकथा सादर करणाऱ्या या भ्रमर ढिल्लेचे नाव खरेच बदलावे लागेल. पण नको! आहे तेच नाव काय कमी भंकस आहे?
("सकाळ'मध्ये प्रसिद्धी तारीख ः 27 जून, 2010)
Petrolless only when oil runs out. But even after oil runs out there may be other new fuels (e.g. bio fuels) which are developed and which are controlled by a few large corporates and so the price of such fuels will controlled and the public will be in the same position as now.
ReplyDelete