Sunday, June 13, 2010

"गोल'गप्पे..!

वेलकम बॅक टू "मन का रेडिओ'... 172.0 एफएमवर आपले "गोल'गप्पे (काही लोक "गोलगप्पे'ला गुपचूप-गुपचूप, पाणीपुरी असेही म्हणतात, पण येथे याचा अर्थ फुटबॉलशी संबंधित आहे) मारण्यासाठी स्वागत. त्याचं काय आहे की, फुटबॉलचा वर्ल्डकप सुरू झाल्यापासून आपल्याकडे वातावरण कसे पार फुलबॉलमय झाले आहे. त्यामुळेच तर फुटबॉलची चर्चा म्हणजेच "गोल'गप्पे मारण्यासाठी आम्ही आतूर झालो आहोत. पावसाळ्यात जसे अचानक बेडकांची उत्पत्ती होऊन त्यांचा "डराव डराव' आवाज येऊ लागतो, तसेच फुटबॉलचा वर्ल्डकप सुरू झाला की, आपल्यालाही फुटबॉल हा जागतिक नंबर वन खेळ असल्याचा साक्षात्कार होऊन तोंडून "गोल गोल' असे चित्कार बाहेर पडू लागतात. तसा तर आमचा आणि फुटबॉलचा संबंध "मिस्टर इंडिया' या जुन्या चित्रपटातील "दे दे...दे दे सायबा, फुटबॉल वापस मुझे' या पॅरोडी गाण्यापासूनच आला होता. ते गाणे ऐकल्यानंतर आम्ही सातत्याने फुटबॉलवर संशोधन करीत राहिलो. पुढे पुढे "मॅराडोनाने किती "रन' काढले' किंवा सचिन तेंडुलकरने किती "गोल' केले, अशा चौकशा करेपर्यंत आमचे ज्ञान वाढत वाढत गेले. पेले, मॅराडोना, डुंगा, झिनेदिन झिदान, रोनाल्डो, रोनाल्डिनो अशी नावे नंतर आमच्या जिभेवर सहज विराजमान झाली. "ब्राझील... ब्राझील...' या वेंगाबॉईजच्या गाण्याने भारतीयांना लग्नसराईत नाचताना किती साथ दिली हे वेगळे सांगायला नको. याकडेही आम्ही लक्ष ठेवून होतो. यंदाचा फुटबॉल वर्ल्डकप सुरू झाला आणि याबाबतीत आम्ही स्वतः भारतीयांना फुटबॉल म्हणजे काय वाटते, त्यांना कितपत समजते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या काही संकलित प्रतिक्रिया थोडक्‍यात अशा -

- फुटबॉल हा खेळ कालच पाहिला. त्यावरून जगभरात किती दारिद्य्र आले याची कल्पना येते. चक्क अकरा खेळाडू एका फुटबॉलच्या मागे अख्खे नव्वद मिनिटे लागले होते, याला काय म्हणावे? काय म्हणता "पीजे पीजे'... पीजेच तर सांगायचा होता.

- मला उद्‌घाटनाच्या सामन्यातील काय आवडले असेल तर शकिराचा डान्स. वा क्‍या बात है... आता मात्र फुटबॉल संपेपर्यंत काही समजले नाही तरी सामन्यांवर लक्ष ठेवावेच लागेल. काय करणार... ऑफिसमध्ये आपण किती फुटबॉल तज्ज्ञ आहोत हे दाखवायला तेच तर कामाला येणार आहे.

- भारतीयांनी फुटबॉलच्या नादी लागू नये. आपण आपले क्रिकेट खेळलेलेच बरे. फुटबॉल आपल्या तब्येतीला मानवणारे नाही. त्यात सारखे 90 मिनिटे इकडून तिकडे आणि तिकडून इकडे पळापळ करावी लागते. नुसता घाम गाळावा लागतो. अन्‌ एवढे करून गोल किती होतात एक ना दोन! आताच्या क्रिकेटपटूंना तरी ट्‌वेंटी-ट्‌वेंटीमुळे बरीच पळापळ करावी लागते, आधी तर कसोटीत पाच-पाच दिवस आरामशीर खेळ चालायचा. आताही फिल्डरच्या वाट्याला केव्हा तरी चेंडू येतो एवढेच. आणि "अंदरकी बात' म्हणजे यात आपले दहा-बारा संघात सहज "शेर' होता येते. फुटबॉलमध्ये शंभरावर देशांशी कोठे "डोके' (हेडर) लावायचे?

- क्रिकेटमध्येही फुटबॉलप्रमाणेच "कार्ड' दाखविण्याची पद्धत सुरू करायला हवी. अमोशा-पौर्णिमेला खेळणारा युवराज नीट नाही खेळला की, त्याला "गुलाबी' कार्ड दाखवायचे (अर्थात अंपायरने). त्यामुळे त्याला थेट क्रिकेट सोडून "बॉलिवूड'मध्ये काम करणे सक्तीचे होईल. धोनी-सचिनने विकेटा फेकल्या की त्यांना "मनी कार्ड' दाखविले जावे. त्यामुळे त्यांच्या जाहिरातीच्या पैशांतून तत्काळ कपात होईल, अशी व्यवस्था करावी इ.इ.

तर मित्रांनो, वरील संकलित प्रतिक्रिया वाचून तुमच्या फुटबॉलच्या ज्ञानात भर पडली असेल असे आम्ही मानतो. फुटबॉल जरूर पहा पण आपला मुख्य खेळ क्रिकेट आहे हे विसरू नका म्हणजे झाले!
 
("सकाळ'मध्ये प्रसिद्धी तारीख ः 13 जून, 2010)

No comments:

Post a Comment

वाचून काय वाटले? मनात ठेवू नका... लगेच प्रतिक्रिया देऊन टाका...