Sunday, May 30, 2010

मान ना मान, मै तेरा महेमान...

आता तुमचे "मन का रेडिओ'... 172.0 एफएमवर... कोणत्या तोंडाने स्वागत करावे, असा प्रश्‍न आम्हाला पडला आहे... त्यासाठी सज्जड कारणही आहे. मुख्य कारण म्हणजे तापमान. "मान ना मान, मै तेरा महेमान' असे म्हणत तापमानाने सर्वांची पार वाट लावली आहे. "मन का रेडिओ'च्या या नॉनएसी स्टुडिओत सध्या तापमान फोर्टी प्लस आहे. त्यामुळे आता येथील वातावरण कसे असेल हे सांगण्याची तशी गरज नाही, तरी आम्ही सांगणारच आहोत, हे तुम्ही ओळखलेच असेल. तर स्टुडिओतील कर्मचारी काम करताना दिसताहेत, पण ते वास्तविक डोळे उघडे ठेवून झोपी गेलेले आहेत... दुपारच्या जेवणामुळे त्यांची अशी अवस्था झाली आहे...काही जण घरीच आराम फर्मावत आहेत आणि ऊन कधी कमी होईल याची वाट पाहत आहेत... विशेष म्हणजे "झिरो लोडशेडिंग' जाहीर असले तरी सर्वांना लोडशेडिंगचा सराव कायम राहावा या उद्दात हेतूने महावितरणमध्ये मध्ये वीज गुल करते. त्याचा परिणाम म्हणून स्टुडिओतील पंखे श्रद्धांजलीसाठी जसे स्तब्ध उभे राहतात अगदी तस्से उभे आहेत... त्यामुळे स्टुडिओतील पाली, उंदरे आदी तत्सम प्राणी, त्यांना काही कळत नसल्यामुळे "जरा पंखा लावा की राव...' या मुद्रेने कर्मचाऱ्यांकडे टक लावून पाहत आहेत... तशात आमचे बातमीदार बंडू भांडाफोडकर धापा टाकतच स्टुडिओत प्रवेश करीत आहेत. त्यांना मुळीच बोलता येत नाहीय... ऊन दुसरे काय? त्यांच्या इशाऱ्यांवरूनच त्यांनी उन्हामुळे त्रस्त झालेल्या काही नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया आणल्याचे स्पष्ट झाले. त्याच प्रतिक्रिया देऊन आजचे प्रक्षेपण थांबवावे लागणार आहे. तर वाचा प्रतिक्रिया...

नागरिक नं. 1 ः कडक उन्हामुळे पाण्याची फार बोंब झालीय हो! नळाला पाणी आले की, दरदिवशी मोटारसायकल, घराच्या बाह्य भिंती नळी लावून मस्तपैकी धुऊन काढण्याचा माझा नियम होता, पण आता... नळाला पाणी येते 20 मिनिटे आणि त्यात वीज मोटार पकडणाऱ्यांची गस्त. त्यामुळे "मोटार लावा, मोटार काढा' यातच वेळ जातो.

नागरिक नं. 2 ः घरी एवढे उकडेतेय की, त्यापेक्षा ऑफिसमध्ये बरे. तेथे निदान झोपा तरी काढता येतात. एरवी आम्ही वर्षभरही तेच करीत असतो. त्यामुळे त्याचा सरावही आहे! घरी झोपच लागत नाही.

नागरिक नं. 3 ः आमच्याकडे पाच दिवसाला एकदा पाणी येते... तेही टॅंकरने. शेजारच्या गल्लीतील नागरिक आणि आमच्या गल्लीतील नागरिक असे एकदमच त्यावर हल्ला करून आम्ही त्या पाण्याचा फडशा पाडतो. अर्थात अर्धे पाणी रस्त्यावरच वाहून जाते, हा भाग वेगळा.

नागरिक नं. 4 ः महावितरणचे आभार जेवढे मानावेत तेवढे कमीच आहेत. एक तर उन्हाळ्याचे दिवस... त्यात आंब्याच्या रसावर मस्त ताव... वर थंडगार सरबत. थंडगार कूलरची हवा... काय होणार? ढेरी बघा कशी चंद्रकलेप्रमाणे वाढू लागली होती; पण महावितरणने मध्येच वीज गुल करण्याची शक्कल लढविली आणि दुपारच्या झोपेचे पार खोब्रे झाले. थोडे रागाने बोललो असे वाटले असेल तर महावितरणची मी माफी वागतो; पण त्यांनी जे काही केले ते नागरिकांच्या भल्यासाठीच ना? आज ना उद्या पुन्हा आपल्याला लोडशेडिंगशी टक्कर घ्यावीच लागणार आहे. मग विजेवाचून राहण्याचा सराव तुटायला नको. त्यासाठीच त्यांचा हा उपाय मला फार आवडला. ढेरीही लेव्हलला आली.

नागरिक नं. 5 ः आता पावसाची प्रतीक्षा आहे... कधी येईल कोण जाणे... दरवर्षी सुरुवात तर चांगली करतो, मग कोठे गायब होतो... असो. आता दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यात वृक्षारोपणाचे फॅड सुरू होईल. "एक झाड, एक फोटो, एक वर्षाने पुन्हा एक खड्डा... त्याच खड्ड्यात पुन्हा पुढच्या वर्षी वृक्षारोपण... पुन्हा पाणीटंचाई, वीजटंचाई, त्यावरून मारामाऱ्या इ...इ...

("सकाळ'मध्ये प्रसिद्धी तारीख ः 30 मे, 2010)

1 comment:

वाचून काय वाटले? मनात ठेवू नका... लगेच प्रतिक्रिया देऊन टाका...