Friday, May 28, 2010

चिअर गर्लचा चित्कार अन्‌ लाईव्ह शो!

वेलकम बॅक टू मन का रेडिओ, 172.0 एफएमवर. क्‍या बात हैं भई, क्रिकेट का मोसम शुरू हो गया है, आयपीएलच्या मस्त मॅचेस पाहून तुमची तबियत खूश झाली असेल. पण आता एवढ्यावरच थांबण्याची गरज नाही. अहो, आता तर थेट थिएटरमध्येच आयपीएलच्या मॅचेस लाईव्ह दिसणार आहेत म्हणे! देशभरातील 1000 मल्टीप्लेक्‍स थिएटरमध्ये हे सामने दिसणार आहेत. पण मंडळी, आता त्यावरही समाधान मानण्याचे कारण नाही, कारण हे सामने थिएटरमध्ये जाऊन पाहताना तुमच्या कानावर "चिअर गर्ल्स'चे चित्कार ऐकू येणार आहेत! म्हणजे पडद्यासमोर असते ना त्या छोटेखानी स्टेजवर खरोखरच्या चिअर गर्ल्स अवतरणार आहेत. तशी व्यवस्थाच करण्यात आली आहे. तिकडे कोणी चौकार-षटकार मारले की, इकडे या चिअर गर्ल्स अंगात आल्यासारखे लाईव्ह नाचणार म्हणे! असो. तर या नव्या फंड्याच्या पार्श्‍वभूमीवर वाचूया एक गाणे...

चिअर गर्ल आली...
मुंबापुरीहून आली...
असं काय नाचता,
तसं काय नाचता...

आता हे नवे तंत्रज्ञान आल्यामुळे पुढे आपल्याला काय काय लाईव्ह करता येऊ शकेल, यावर "मन का रेडिओ'च्या एक्‍स्पर्ट टीमने लगोलग संशोधन करून टाकले आहे. ते असे ः

"सासू पण कधी सून होती...' लाईव्ह ः यामध्ये या सिरिअलचे थेट लाईव्ह प्रक्षेपणच करता येईल. तिकडे सासूने सुनेच्या (किंवा व्हाईस व्हर्सा, असेही होते बरे का आजकाल!) कानाखाली आवाज काढला की, इकडे स्टेजवर बसलेल्या काही बायका मोठमोठ्याने "रुदाली'सारख्या रडायला लागतील. किंवा तिकडे सिरिअलमधील बायकांचे (नागिनस्टाईलचे गंध वगैरे लावलेल्या) कटकारस्थान शिजू लागले की इकडे स्टेजवरील बायका आपापसात कुजबुजू लागतील. मध्येच "चक चक, अरेरे फार वाईट झाले' असे बॅकग्राउंड म्युझिक तयार करतील. कोण मेले, कोणाचा दुसरा अवतार सुरू झाला, कोणी मरून अचानक परतले की, त्या त्या सिच्युएशननुसार स्टेजवर आपल्याला लाईव्ह फिल देण्यासाठी जे काही करावे लागेल ते करता येईल.

लाफ्टर शो लाईव्ह ः आता असेही लाफ्टर शोचे एवढे पीक आले आहे की, थिएटरमध्ये जाऊन कोण पाहणार असे वाटेल; पण तसे नाही. त्याला "लाईव्ह'ची साथ असल्यामुळे ते फार रंगतदार होतील. तिकडे पडद्यावर कोणी लाईव्ह बाष्कळ विनोद सांगितला की, इकडे खाली बसलेले शे-दोनशे माणसं मोठमोठ्याने हसायला लागतील. आता अशी हसण्याची कॅसेट लावता आली असती; पण समोर साक्षात लाईव्ह लोक हसताहेत म्हटल्यावर पाहणाऱ्यालाही आपोआपच हास्य योग संघात आल्यासारखे वाटेल अन्‌ त्यालाही नसलेल्या विनोदावर हसू फुटेल. यातून दोन गोष्टी साध्य होतील. मनोरंजन ते मनोरंजन होईल वर हसण्याचा व्यायाम फ्री!

दहावी-बारावी परीक्षा लाईव्ह ः आता ही एकदम ब्रॅंड न्यू कल्पना आहे. दहावी-बारावी परीक्षेचा पेपर सुरू असतानाचे जे काही प्रकार होतात ते लाईव्ह पाहणे म्हणजे एक लाईफटाईम कार्यक्रम पाहिल्याचा आभास प्रेक्षकाला होणार आहे. परीक्षा केंद्रावर आपल्या पाल्याच्या मदतीसाठी हातात कॉप्या घेऊन तत्पर असलेले पालक, पोलिस आणि कॉप्या पुरविणाऱ्यांचा पाठशिवणीचा खेळ, केंद्रावरील कर्मचारी यांचे परीक्षार्थींना सहकार्य, काही धाडसी विद्यार्थ्यांचे सुपरमॅन, जेम्स बॉंडप्रमाणे खिडक्‍यांतून कॉप्या पुरविणे हे सर्व लाईव्ह सुरू असताना इकडे स्टेजवरही साधारणतः तसाच गोंधळ सुरू ठेवता येईल. विशेष म्हणजे त्यात प्रेक्षकांनाही सहभागी होता येईल. तज्ज्ञ कॉपी पुरवठादारांना आपली मते "साईड बाय साईड' मांडता येईल. एकूणच "एकमेकां साह्य करू, अवघे परीक्षा पास करू' हे ब्रीद सार्थ ठरेल.

(या आयडिया "मन का रेडिओ'तर्फे सर्वांसाठी फ्री आहेत. कोणीही याचा वापर करू शकतो).

("सकाळ'मध्ये प्रसिद्धी तारीख ः 14 मार्च, 2010)

No comments:

Post a Comment

वाचून काय वाटले? मनात ठेवू नका... लगेच प्रतिक्रिया देऊन टाका...