वेलकम बॅक टू "मन का रेडिओ', 172.0 एफएमवर. आज होळी, उद्या धूळवड. तशी तर आजच तुमची धूळवड सुरू झाली असेल नाही? आमची तर सुरू झाली बुवा. त्याचं काय आहे, "मन का रेडिओ'वर आयोजित खास "बोंब मारो बोंब' कार्यक्रमामुळे येथे वातावरण कसे "रंगी'न झालेले आहे. आता हा रेडिओ असल्यामुळे तुम्हाला आमची तोंडं किती आणि कशी रंगली हे कळणार नाही; पण सुरवातीला ऐकविलेल्या गाण्याने एकूणच माहौल कसा असेल कळलेच असेल, तर "बोंब मारो बोंब' कार्यक्रमात आपले स्वागत. या लाईव्ह कार्यक्रमात काही नामांकितांनी धूळवड कशी साजरी केली याचा "आँखो देखा कानो सुना' हाल, तुम्हाला वाचायला मिळणार आहे. तर वाचा...सर्वात प्रथम एक उत्तरभारतीय आमदार काय गाणे म्हणताहेत ते हळूहळू ऐकू येऊ लागले आहे... बोल एकदम अस्पष्ट आहेत... आजूबाजूला सुंदर सुंदर ललनांचा घोळका "डान्स' करीत आहे. गाणे आता स्पष्ट ऐकू येऊ लागले आहे...
अरे पैसा पैसा क्या करती है,
पैसों का मैं ढेर लगा दूं
जो तू हो जाए मेरी....
यावर सदर विधायकाने जो काही डान्स केला असेल तो लिहिणे अवघड आहे. पाहणे तर त्याहून अवघड. आता पुढे जाऊ या. इथे पोस्ट मास्तर जनरल असे फारच "जनरल' वाटणारे पद भूषविणारे एक महाशय काय म्हणतात ते पहा -
दे दे मुझे तू घूस
दो कोटी बारा आणा,
मारे गा भैय्या ना ना!
आता या "जनरल'चे उर्वरित दिवस हवालातमध्ये जावोत, अशा शुभेच्छा देऊन पुढे सरकू या. अरेच्चा इथे हा कोण बसलाय वस्तूंची मोजदाद करीत? कल्याण-डोंबिवलीतला अधिकारी दिसतोय... एक जबरदस्त फ्लॅट, त्यात बाथरूम... बाथरूम म्हणजेच एक स्वतंत्र फ्लॅट... सहा प्लाझ्मा टीव्ही, 100 पॅंटी, 150 शर्ट, 50 टीशर्ट... इ. इ. त्याचे हे बडबडगीत...
""अरेरे.... किती कष्टाने... किती लोकांच्या मुंड्या मुरगळून हे पैसे जमविले होते रे... कोणा नतदृष्टाची दृष्ट लागली रे... सगळे गेले रे... बुरा ना मानो होली है रे...''
पुढे सरकूया... इथे तर शतकातील सर्वात महान क्रिकेटपटू बिस्किटे खात बसलाय. त्याला काही विचारले तर तो म्हणतो, "मेरा दोस्त आनेवाला हैं, मेरा दोस्त आनेवाला हैं. आप भी हो सकते हैं...' तो फक्त एवढे म्हणतानाच हसतोय. इतर वेळी मात्र गप्प. एकदम चिडिचिप. अरे बाबा आता महाराष्ट्र शासन तुझ्यासाठी "म्युझ्यम' बांधणार, तुझ नाव "भारतरत्न'साठी सुचविणार एवढे सांगितले तरी हा सिरिअसच. होली है... म्हंटले तरी सिरिअसच. त्याला विचारले तर तो म्हणाला, ""बॉईज प्लेड वेल. मी पण प्लेड वेल. पण मी आता दोनशे काय मारले सगळ्यांना मी महान असल्याचा साक्षात्कार झालाय. इतके दिवस मला नावं ठेवायचेत. सेंच्युरी झाली की आऊट होतो म्हणून.''
"मग ते काय खोटे होते?' असे म्हणून कोणी तरी या महान क्रिकेटपटूवर रंग टाकला अन् लंपास झाला. बुरा ना मानो... होली हैं...
("सकाळ'मध्ये प्रसिद्धी तारीख ः 28 फेब्रुवारी, 2010)
No comments:
Post a Comment
वाचून काय वाटले? मनात ठेवू नका... लगेच प्रतिक्रिया देऊन टाका...