वेलकम बॅक टू मन का रेडिओ... 172.0 एफएमवर! आजच्या दिवशी आजचाच "मन का रेडिओ'चा एपिसोड प्रसारित व्हावा, ही तो ईश्वराची इच्छा! आता ही काय नवीन भानगड असे अनिच्छेने पाहू नका. त्याचं काय आहे, आजचा कार्यक्रम "व्हीव्हीएस' (व्हेरी व्हेरी स्पेशल, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण नव्हे!) आहे. आज "मन का रेडिओ'मध्ये भरलीय "मन की अदालत'. यामध्ये तुमचा आवडता आरजे पद्या त्याच्या "मना'ला वाट्टेल ते प्रश्न विचारणार आहे आणि तेही थेट ईश्वराला! अरे बापरे, एवढी एक्स्कुझिव्ह बातमी एवढ्या सहजतेने आम्ही सांगितल्याबद्दल आम्हालाच आश्चर्य वाटत आहे. असो. "मन की अदालत'मध्ये आम्ही थेट ईश्वरालाच पाचारण करण्याचे कारण म्हणजे नुकतीच एका आश्रमात झालेली चेंगराचेंगरी आणि त्यासाठी जबाबदार धरण्यात आले ते थेट ईश्वरालाच! ""आश्रमातील व्यवस्था चोख होती; पण काय करणार ईश्वरच चेंगराचेंगरीला जबाबदार आहे,'' असे आश्रमाच्या प्रवक्त्याने सांगितले म्हणे! त्यामुळेच तर ईश्वर आहे असे समजून आम्ही ही अदालत बोलावली आणि तसेच कोणी तरी आलेही. त्यातून इतर काही समस्यांचाही उलगडा होऊ शकेल. तर वाचूया "मन की अदालत'... 172.0 एफएमवर...
(श्रीमानजी ईश्वरजी हाजीर हो... अशी हाळी... त्यानंतर अचानक झगमगाट होऊन, ईश्वरासारखे कोणी तरी खुर्चीवर स्थानापन्न झालेले दिसतात. त्यांच्या हातात माईक देण्याचा प्रयत्न स्पॉटबॉय करतो, पण ईश्वरजी "चुटकी' वाजवतात आणि त्यांच्या हातात आपोआप माईक येतो. पुढे...)
- ईश्वरजी आपले "मन की अदालत'मध्ये स्वागत. आपल्यावर आरोप आहे की, सदर आश्रमात झालेल्या चेंगराचेंगरीला आपणच जबाबदार आहात. आपण ही जबाबदारी घेता काय?
ईश्वर ः अरे बाबा, ही काय एखाद्या स्फोटाची जबाबदारी घेण्यासारखे सोप्पे आहे का? आपली कोणतीही संघटना उठते आणि घेते जबाबदारी! आय हॅव टू चेक ऑल इन्सिडेन्स. आमच्या रेकॉर्ड विभागाला याबाबतीत चौकशी करण्यास आम्ही सांगितले आहे. सत्यशोधन समितीही स्थापन झाली आहे. तिचा अहवाल येताच या घटनेला जो कोणी जबाबदार असेल, त्याला कडक शासन करण्यात येईल.
- असे असले तरी तुम्हाला ही जबाबदारी झटकता येणार नाही. ही घटना झालीच कशी?
ईश्वर ः त्याचं काय आहे, की आजकाल भक्तांची संख्याच एवढी वाढली आहे की, विचारू नका! त्यांच्या मागण्या, अपेक्षाही प्रचंड वाढल्या आहेत. कोणाला डॉक्टर व्हायचंय, कोणाला इंजिनिअर, कोणाला प्रेमात यश हवं आहे तर कोणाला नोकरी! (तरुण भक्तांची संख्या वाढण्याची ही दोन कारणे असावीत). आता या सर्वांची पूर्तता करावीच लागते. शेवटी "इमेज'चा प्रश्न आहे. आपल्या समस्या सोडविण्यासाठी लोकांनी कोणालाही "मध्यस्थ' न ठेवता थेट माझ्याशी कॉंटॅक्ट केला तर वरील प्रकारच्या घटना टळतील. माझा कॉंटॅक्ट नंबर मी थोड्या वेळात देतो.
- देशातच नव्हे तर जगात भ्रष्टाचार बोकाळलाय, अनीती वाढली आहे, अन्याय-अत्याचार वाढले आहेत. आपले काय म्हणणे आहे?
ईश्वरजी ः तुम्हाला देशाचे पाहिजे की जगाचे? एकच काही तरी सांगा. माझ्याकडे बिल्कूल वेळ नाही. बी स्पेसिफिक.
- ओके, सर. फक्त भारताविषयी सांगा.
ईश्वरजी ः आता प्रत्येक गोष्टीला मीच जबाबदार आहे, असे तर तुम्हाला म्हणायचे नाही ना? कोणतेही काम करायचे असेल तर संबंधिताला पैसे चारण्यासाठी तुम्हीच आधी तयार असतात. त्याला मी काय करणार? आपले काम टाळून ते दुसऱ्याच्या गळ्यात कसे बांधायचे, यात तर मानवजमात "एक्स्पर्ट'! त्यामुळेच इतरांवर अत्याचार होतो. आता हे करायला मी सांगतो की काय? एकूणच हा मानवप्राणी फारच अवघड झाला आहे. त्याला कंट्रोल करण्यासाठी काय करावे, यावर आमच्याकडे आता विशेष चर्चासत्र आयोजित केले आहे. त्यातून नक्कीच काही तरी ठोस येईल. तुम्हाला यायचे का चर्चेसाठी "वर'? करू का व्यवस्था?
- सॉरी, सर. तुम्ही दिली तेवढी उत्तरे खूप झाली. आल इज वेल, आल इज वेल... आजची "मन की अदालत' येथेच संपवूया. तुमचा कॉंटॅक्ट नंबर आमच्या वाचकांसाठी द्या ना...
(ईश्वरजींनी दिलेला 50 आकडी कॉंटॅक्ट नंबर पृथ्वीतलावरून लागणे शक्य नसल्याने तो देता येत नाही. श्रद्धाळूंनी तो स्वतःच शोधावा, नास्तिकांनी सोडून द्यावे. क्षमस्व.)
("सकाळ'मध्ये प्रसिद्धी तारीख ः7 मार्च, 2010)
No comments:
Post a Comment
वाचून काय वाटले? मनात ठेवू नका... लगेच प्रतिक्रिया देऊन टाका...