Saturday, May 22, 2010

पालकाची जुडी...

सहाची ती गाडी गेली आता
नवाची बी गेली आता
बाराची गाडी निघाली
मला जाऊ द्या ना घरी
वाजलेची तीन-तेरा...

वेल कम टु मन का रेडिओ 172.0 एफएम. मंडळी मन का रेडिओच्या घड्याळीत आता तीन-तेरा वाजले आहेत; म्हणजेच तीन वाजून 13 मिनिटे झाले आहेत, त्याप्रमाणे तुमच्या घड्याळीचा टायमिंग सेट करू नका. आमचे घड्याळ थोडे इंटरनॅशनल आहे. आजकाल पेशन्स एवढी वाढली आहे, की कोणालाही वाटते कोठे तरी जाऊन आत्महत्या करावी; म्हणजे सुटलो बा एकदाचे! अहो, एवढेच कशाला अगदी शाळकरी मुलांनाही टेंशन अभ्यासाचे, डॉक्‍टर बनण्याचे, इंजिनिअर बनण्याचे!! त्यांनाही वाटायला लागले करून टाकावी एकदाची आत्महत्या. पालकांना बसा म्हणावं बोंबलत. तर मंडळी अशा या घनघोर परिस्थितीत मन का रेडिओच्या स्टुडिओत आज आली आहे पालकाची जुडी... माफ करा जोडी आणि त्याच्याबरोबर आला आहे चौथीत शिकणारा त्याचा मुलगा. जाणून घेऊ या त्याचे मन. तो पढते रहो मन का रेडिओ 172.0 एफएमवर. तर माझा पहिला प्रश्‍न विद्यार्थ्यांच्या वडिलांना आहे- तुमचा मुलगा चौथीत आहे. तुम्ही त्यांच्या करिअरसाठी आतापर्यंत काय केले? (वडील बोलण्याचा प्रयत्न करतात तेवढ्यात आईची कॉमेट्री सुरू होते.)

आई : अहो, या कारट्यासाठी काय केले नाही ते विचारा? याचा जन्म झाला नव्हता तेव्हापासून खसता खातो कशासाठी... बी फोर बर्थ. मी त्यांना सांगून ठेवले होते, चांगली इंग्रजी शाळा बघून आधीच ल1/2गा लावून ठेवा; नंतर मुलाला प्ले ग्रुपमध्ये टाकायचेसुद्धा होतील वांदे. आमचे कसे सगळे प्री-प्लॅन असते. मुलगा शंभर टक्‍के डॉक्‍टर व्हायला पाहिजे किंवा इंजिनिअर.

वडील : अगं ते सांगना ट्युशनचे...

आई : तेच तर सांगत होते. हा पहिलीत गेलाना तेव्हापासून ट्युशन लावली याला, नाही तर आजकाल पोरं पार वाया जातात. याचा टाइप टेबलच पाहा ना. सकाळी साडेसात ते दुपारी एक शाळा, दुपारी दोन ते पाच ट्युशन, संध्याकाळी सहा ते आठ अभ्यास, आठ ते दहा टीव्हीवरील सिरिअल. पुढे झोप.

-अहो, हा खेळतो कधी?

आई : तेच तर सांगत होते. आमचा मुलगा कोणत्याही क्षेत्रात मागे पडायला नको म्हणून आम्ही डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवून आहोत. घरात सर्व प्रकारची खेळणी उपलब्ध आहे; फक्‍त आम्ही त्याला उन्हाळ्याच्या सुटीत खेळ एवढेच सांगतो. मध्ये खेळला तर त्याला माझा एक धपाटा बसतो पाठीत.

वडील : अगं, उन्हाळ्याच्या सुटीत डान्स क्‍लास लावला होता त्याचे सांग ना...

आई : तेच तर सांगत होते...

आईने ते सांगण्यापूर्वी वाचू या एक रिमिक्‍स गाणे...

तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा
डॉक्‍टर की औलाद है डॉक्‍टर बनेगाडा
न्स पे चॉन्स मार ले,
सोनिया...डान्स पे चॉन्स मार ले

मंडळी वेलकम बॅक टू मन का रेडिओ. आपण जाणून घेत आहोत पालकांचे मन. आपल्याकडे आलेल्या या विद्यार्थ्याने डान्स पे काय चॉन्स मारला हे ऐकू या त्याच्या आईकडूनच.

आई : "तेच तर सांगत होते... अगदी तीन वर्षांचा होता तेव्हाच त्याचे पाय पाळण्यात दिसले. आम्ही सारखे म्हणायचो एक पाय नाचो रे गोविंदा.गोविंदासारखा डान्स यावा म्हणून आम्ही त्याला गोविंदा डान्स अकादमीमध्ये टाकलं आणि त्याने चान्स मारला. अभ्यासाकडे पार दुर्लक्ष केलं.

वडील : अहो, सहामाही परीक्षेचा रिझल्ट पाहा ना, या कारट्याचा... त्याला पडले 95.05 टक्‍के मार्क.

आई : अहो, तुम्हीच सांगा आताच्या कॉम्पिटिशनच्या जमान्यात एवढ्या मार्कने काय होते? तो शेजारचा राहुल बघा 95.07 टक्‍के मार्क मिळवून शाळेत फर्स्ट आला; पण हा गधडा सेंकड. आता हा डॉक्‍टर कसा होणार, इंजिनिअर कसा होणार! मला तर बाई भारी टेंशन येते. तरी मी म्हणत होते आणखी एक ट्युशन लावून टाका म्हणून. फार बिघडला हा. मंडळी या बिघडल्यावर वाजवू या एक सुपरहिट गाणेअम्मा देख तेरा मुन्ना बिघडा जाय पापा देख तेरा मुन्ना बिघडा जाय मंडळी आपल्याकडे स्टुडिओत आलेला हा बिघडलेला मुलगा खरंच बिघडलेला आहे का? त्याला सुधारण्यासाठी काय करावे? त्याला आणखी एखादी ट्युशन लावावी का? त्याच्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या, खसता खाणाऱ्या त्याच्या आई-वडिलांना त्याने फर्स्ट येऊन दाखवू नये का? आपल्याकडे डॉक्‍टर, इंजिनिअर यापेक्षा कोणता चांगला व्यवसाय शिल्लक नसताना या मुलाने तरी डान्सच्या मागे का लागावे? या प्रश्‍नांची उत्तरे फटाफट पाठवा मन का रेडिओकडे. लकीविनरला मिळेल गिफ्ट हॅम्पर अमुकअमुक ट्युशन क्‍लासेसकडून...

(सकाळमध्ये प्रसिद्धी तारीख ः 17 जानेवारी, 2010)

No comments:

Post a Comment

वाचून काय वाटले? मनात ठेवू नका... लगेच प्रतिक्रिया देऊन टाका...