आला धोंड्याचा महिना,
सासरेबुवा झटपट कर्ज काढा,
मला पाहिजे सोन्याचा धोंडा...
वेलकम बॅक टू मन का रेडिओ... 172.0 एफएमवर आपले स्वागत आहे. तमाम जावईबापूंचा आवडता महिना अर्थात "धोंड्या'चा महिना आता शेवटाकडे झुकला आहे. या पार्श्वभूमीवर आमचे रिपोर्टर धोंडोपंत घिसाडघाईकर यांनी काही सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आणल्या आहेत. काय म्हणता, तुम्हालाही वाचायच्यात या प्रतिक्रिया...तर वाचा... आमचे काही ऑब्जेक्शन नाही. पढते रहो, मन का रेडिओ... पढते पढते...
अक्षय कुमार ः चलो बुलावा आया हैं, "काका'ने बुलाया हैं... जय माता दी... सभी बहेनो और भाईयोंको, मन का रेडिओ पढने वालों को मेरा नमश्कार. आय लाईक "धोंडा'. अरे बाबा मी महाराष्ट्रात राहतो, माझी रोजीरोटी इथे आहे, मग मला "मराठी' न यायला काय झाले? त्यामुळे मराठी कल्चरमधील "धोंड्या'चा महिना मला फारच आवडतो. ट्विंकलबरोबर लग्नाला इतके वर्षे झाली पण कधी सासरेबुवा "काकां'नी (अर्थात राजेश खन्ना) धोंड्याला बोलावले नाही, पण या वर्षी काय झाले काय माहित. फर्स्ट टाइम आमंत्रण आलेय. सासूबाई डिंपलजींनीही आग्रहाने बोलावलेय. जाना तो पडेगाईच. आखिर माझा हा पहिलाच धोंडा आहे.
धोंडोपंत घिसाडघाईकर (एक्स्पर्ट कमेंट) ः आपला आवडता अक्षय धोंड्यासाठी सासरी जाणार आहे. त्याच्यासारखा धोंडा गळ्यात पाडून घेतला, त्याला पैलू पाडले, त्याला सुपरस्टार केले अशी समजूत होऊन तर काकांनी त्याला बोलावले नाही ना? वाचू या दुसरी प्रतिक्रिया...
गुलशन ग्रोव्हर ः बॅड मॅन. मी हिरो लोकांच्या डोक्यात धोंडा घालणारा म्हणून फेमस, पण इथे तर लोक "धोंडा' खायला स्वतःहून जातआहेत. मला अजून सासरच्यांनी धोंडा खायला बोलावले नाही, याचे वाईट वाटते. वाटते एखाद्याच्या डोक्यातच "धोंडा' घालावा...
धोंडोपंत ः आता याला घरी बोलवून कोण पायावर धोंडा पाडून घेईल म्हणा, वाचा नेक्स्ट प्रतिक्रिया...
सलमान ः वॉव! आय लाईक धीस "धोंडा' कल्चर. आता वेळीच लग्न झाले असते तर आतापर्यंत दोन-तीन धोंडे तरी खाल्लेच असते, पण काही हरकत नाही. पुढच्या वेळेस तरी नक्कीच धोंडा खाईल... हंड्रेड पर्सेंट... ये मेरा वादा हैं... यहॉं भी होगा, वहॉं भी होगा... मेराही धोंडा...
सचिन तेंडुलकर ः वेल... बाईज प्लेड वेल, पण ऐन धोंड्याच्या महिन्यात ट्वेंटी-ट्वेंटी वर्ल्डकप खेळावा लागतोय म्हणून इंडियन टीम ऑस्ट्रलियाविरुद्ध इतकी वाईट खेळली. इथून पुढे आयसीसीने वर्ल्डकपचे नियोजन करताना "धोंड्या'च्या महिन्याची दखल घ्यावी. किमान आता तरी आयसीसीने भारतीय टीमला वेस्ट इंडिजमध्ये "धोंडा' करावा.
धोंडोपंत ः सचिनने तमाम जावई खेळाडूंची कैफियत मांडल्याबद्दल त्याचे अभिनंदन. पण आम्ही तर त्याच्या वैयक्तिक धोंड्याविषयी विचारले होते? असो. वाचूया शेवटची प्रतिक्रिया...
रणबीर कपूर ः काय... धोंडा... आश्चर्य वाटले ना! माझे लग्न पण झाले नाही अन् मला धोंड्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी येथे बोलावलेय. पण काय करणार? मिडियाला सांभाळावे लागते बाबा. हा "मन का रेडिओ'चा रिपोर्टर... क्या नाम बताया उसने... हां... धोंडोपंत... उसका जरा स्क्रू ढिला दिखता हैं... जरा फिट कर के आता हूँ...
(यानंतर धोंडोपंत कॅसेट घेऊन आले ते थेट "मन का रेडिओ'च्या स्टुडिओत आणि तीच तुम्ही ऐकली. पण एकूणच मामला गंभीर आहे. या प्रतिक्रियांचं काही खरं दिसत नाही. आम्ही या प्रतिक्रिया प्रसिद्ध केल्या नाहीत आणि तुम्ही त्या वाचल्या नाहीत. ओके...)
("सकाळ'मध्ये प्रसिद्धी तारीख ः 9 मे 2010)
No comments:
Post a Comment
वाचून काय वाटले? मनात ठेवू नका... लगेच प्रतिक्रिया देऊन टाका...