वेलकम बॅक टू मन का रेडिओ, 172.0 एफएमवर आपले स्वागत आहे. ले लो भई पंजाब किंग्ज इलेव्हन ले लो,गरम मसालेदार टीम ले लो, घ्या हो घ्या, पंजाब किंग्ज इलेव्हन घ्या,गरम मसालेदार किंग्ज इलेव्हन घ्या..."मन का रेडिओ'च्या प्रातःकालीन सेवेत आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, पंजाब किंग्ज इलेव्हन संघ आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत फर्स्ट नंबरवर (खालून) असल्यामुळे त्याच्या अनेक मालकांपैकी काहींना हा संघ एकदाच फुकून (विकून) टाकावा, असे वाटू लागले आहे. मालकीनबाई प्रीती झिंटाचा मात्र याला विरोध असल्याचे कळले आहे. एकूणच या प्रकरणावर आधारित श्रुतिका सादर करीत आहोत... "किंग इज युवराज सिंग'...
(सकाळची झुंजुमुंजू वेळ... रेडिओवर "घनःश्याम सुंदरा' गाणे लागलेले... बाहेर गायी हंबरताहेत, कोंबडे कॉक् कॉक् करून बांग देताहेत. (कोंबडी पळाली गाण्यामुळे आजकाल कोंबड्या "कुकुचकू'ऐवजी कॉक् कॉक् करतात...). किंग्ज इलेव्हनचा कर्णधार माहेला जयवर्धने घाईघाईने युवराजसिंगच्या ड्रेसिंग रूममध्ये घुसतो... पुढे..)
माहेला ः यंड युवी यंड, दी एंड... उट उट (सिंहली भाषा... आपल्याला काय कळते त्यातले?)... कोण आलंय बघ साक्षात मालकीनबाई आल्यात. (युवराजसिंग नाव उठता उठत नाही)
मालकीनबाई ः महिला... महिला... उसको जल्दीसे उठाओ...
माहेला ः मॅडम, प्लीज मला "महिला... महिला' नका ना म्हणू! मी "माहेला' आहे..
मालकीनबाई ः ओके, ओके, नुसते शब्दांचा काथ्याकूट करण्यात पटाईत आहात. त्याऐवजी मॅचमध्ये बॉल कुटला असता तर निदान किंग्ज इलेव्हनची जी हालत झाली ती झाली नसती. प्रॅक्टिस करायची सोडून हा चक्क घोरत पडलाय. उठाओ इसको, वर्ना...
माहेला ः ओ, मॅडम या फिल्मी धमक्या कोणाला देताय? वर्ना बिर्ना कुछ नहीं. मी एकटा काय काय करणार? तुमचे हे दिवटे बघा कसा आराम फर्मावत आहेत. हा खेळणार आमोश्या-पौर्णिमेला... याला कोणी काही म्हणत नाही. आता उरलंच काय म्हणा यंदाच्या "आयपीएल'मध्ये!
मालकीनबाई ः इनफ इज इनफ... मी चांगल ट
ीमला वाचवायला निघाले अन् तुम्ही लोक मलाच टॉर्चर करता? 35 कोटीला घेतलेली टीम 25 मध्येच फुंकून टाका म्हणून सगळे मागे लागलेत. पण मी होते म्हणूनच टीम नाही विकली. नाही तर...
माहेला ः ः नाही तर... काय? कोण घेणार असल्या टीमला 25 कोटी देऊन? मी होतो म्हणून कॅप्टन झालो... थांबा, आज फैसला करूनच टाकूत... याला बादलीभर पाणी... नको... साध्या पाण्याने हा उठणार नाही. कोल्ड्रिंकच टाकूनच उठवतो याला. उलाला उले उलेलो... (एवढे म्हणताच इतका वेळ झोपेचे सोंग घेतलेला युवराज ताडकन् उठतो).
युवराज ः थांबा! खबरदार, गडबड करू नका. नाही तर असा स्ट्रेट ड्राईव्ह मारील की...
माहेला ः ः मालकीनबाईंना क्रिकेट कळत नाही म्हणून क्रिकेटच्या भाषेत बोलतोस काय? झोपलेल्याला उठवता येते; पण झोपी गेल्याचे सोंग करणाऱ्याला नाही, हेच खरं. एवढा कंटाळा आला तर जा ना तिकडे तेंडुलकरच्या टीममध्ये...
युवराज ः खामोश... किंग इज सिंग, किंग इज सिंग... सिंग वुईथ मी... आता आपल्याला "ले लो भाई किंग्ज इलेव्हन ले लो' म्हणून ऍड करावी लागेल नाही का मॅडम? ऍड म्हटले की पैसे आलेच. चला सुटलो बुवा! एकदाच हिशोब करून टाका आमचा अन् द्या मुक्ती. (माहेलाकडे पाहत) नाही तरी या "महिलांच्या' टीममध्ये खेळणे या युवराज "किंग'ला शोभत नाही.
(एवढे बोलून युवराज पळत सुटलाय... त्याच्यामागे माहेला अन् त्या मागे मालकीनबाई... युवी युवी करीत...)
(प्रसिद्धी तारीख ः 10-4-10)
No comments:
Post a Comment
वाचून काय वाटले? मनात ठेवू नका... लगेच प्रतिक्रिया देऊन टाका...