सुस्वागतम, सुस्वागतम... पुन्हा एकदा आपले स्वागत आहे "मन का रेडिओ'वर अर्थात 172.0 एफएमवर! मंडळी काही तरी चुकल्या चुकल्यासारखे वाटतेय ना! अगदी बरोबर. आमची सुरवातीची घोषणा शुद्ध मराठी तुपात घोळण्याचा आटोकाट प्रयत्न आम्ही केलाय. पण काय करणार, शेवटी "मन का रेडिओ' आणि "एफएम' या हिंदी-इंग्रजी मिश्रित शब्दांनी आमचे तूप एकदम "डालडा' करून टाकले. आता भाषांची अशी सरमिसळ झालीय की, आमचीच काय कोणाचीही बोली सुधारणे अवघड झाले आहे. असो! काही दिवसांपूर्वीच टॅक्सी चालविण्याचा परवाना पाहिजे असेल तर त्या व्यक्तीला मराठी येण्याचे कम्पल्सरी करण्यात आले होते. शिवाय, तो किमान 15 वर्षे महाराष्ट्राचा रहिवासी असणेही आवश्यक करण्यात आले होते. पण या काही दिवसांपूर्वीच्या दुसऱ्याच दिवशी हा आदेश बदलून "मराठी'ऐवजी "स्थानिक' भाषा असे करण्यात आले होते. त्यामुळे आता अशा व्यक्तीला मराठीबरोबरच गुजराती, हिंदी आदी भाषा आल्या तरी चालण्यासारखे आहे. आम्हाला तर वाटते, प्रत्येक टॅक्सीचालकाला किमान आठ-दहा स्थानिक भाषा आल्याच पाहिजेत! कोण जाणे, कधी कोणत्या भाषेचे काम पडेल! कल्पना करा... जर मराठी कम्पल्सरी केली असती, तर काय बहार आली असती. महाराष्ट्रभरात आणखी एक नवा उद्योग विकसित झाला असता तो म्हणजे भाषा शिकविण्याचा! सर्व बिहारी, यूपीवाल्या मंडळींना थेट मराठी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घ्यावा लागला असता... एवढेच कशाला थेट यूपी, बिहारमध्येच "सुलभ मराठी कोचिंग क्लासेस' सुरू झाले असते. अर्थात त्याची मूळ शाखा मुंबई, पुण्यातच राहिली असती! या क्लासेसना कदाचित लालूजी आणि मुलायमजींनी मग अनुदानही दिले असते. एवढेच कशाला बिहारी, यूपीच्या भाषेतच "मराठीचे व्याकरण' प्रा.रस्तोगी, प्रा.चौधरी अशा नावाच्या मंडळींनी पुस्तकावर पुस्तके काढून शिकविले असते! या नव्या उद्योगातून किती बिहारी आणि मराठी बांधवांना रोजगार मिळाला असता नाही!
(ता. क. वेलकम बॅक टू "मन का रेडिओ, 172.0 एफएम' अशी आरोळी आम्ही दरवेळी ठोकतो; पण त्यातूनही अनेक गमतीजमती होत आहेत. काही मंडळी 172.0 एफएम थेट त्यांच्या मोबाईलच्या एफएमवर ट्यून करून पाहत आहेत! "मन का रेडिओ' न लागल्यावर म्हणे एखाद्या तज्ज्ञाला गाठून हे स्टेशन का ट्यून होत नाही, यावर सल्लाही घेत आहेत. त्यावर तज्ज्ञ मंडळी हा रेडिओ अजून लॉंचच झाला नाही. थोडे सबुरीने घ्या, असा सल्लाही देत आहेत...! मंडळी "मन का रेडिओ' हा जगातील पहिला "लेखी रेडिओ' आहे. त्यामुळे तो फक्त तुम्हाला येथेच, याच जागेवर, याच दिवशी वाचायला मिळेल. इतरत्र नाही...! तो लगे रहो...)
("सकाळ'मध्ये प्रसिद्धी तारीख ः 24 जानेवारी, 2010)
No comments:
Post a Comment
वाचून काय वाटले? मनात ठेवू नका... लगेच प्रतिक्रिया देऊन टाका...