Saturday, May 22, 2010

दरोडा टाळण्यासाठी "चाकुमि' त्रिसूत्री

"मन का रेडिओ'च्या "दरोडा स्पेशल' बातमीपत्रात आपले स्वागत.आजच्या ठळक बातम्या.औरंगाबाद शहरातील वाढत्या दरोड्यांच्या आणि त्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी केलेल्या आवाहनामुळे शहरात चाकू, कुऱ्हाडीबरोबरच मिरची पूडची मागणी प्रचंड वाढली आहे. या वस्तू रेशनकार्डवर उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी महिला संघटनांकडून पुढे आली आहे. दरोड्यासंदर्भातील पोलिसांच्या भूमिकेचे जागतिक स्तरावर स्वागत होत असून, दरोडाप्रकरणी नागरिकांनी तक्रारी नोंदवून पोलिसांना विनाकारण त्रास देऊ नये, असाही उपाय सुचविण्यात येत आहे. दरम्यान, पोलिस यंत्रणा दरोड्यांमुळे सक्रिय झाली असून, "तपासू सुरू आहे.' आता सविस्तर वृत्तांत ः औरंगाबाद शहरात काही दिवसांपूर्वी सराफा व्यापाऱ्यावर पडलेल्या "धाडसी'(!) दरोड्यामुळे शहराचे नाव जागतिक नकाशावर गेल्याचे मानले जात आहे. त्यातच "सीसीटीव्ही'वर याचे (चुकून) चित्रीकरण झाल्यामुळे या दरोडेखोरांचा तपास करणे हे पोलिसांचे नैतिक कर्तव्यच झाले आहे! दरोड्याचे प्राथमिक तपासाचे कामच "सीसीटीव्ही' कॅमेऱ्याने केल्यामुळे आता दरोडेखोर पकडण्याचे काम पोलिसांच्या डाव्या हातचा मळ असल्याचे मानले जात आहे. त्यादृष्टीने पोलिसांचा जोरदार तपास सुरू असून, तपासाने एवढा वेग घेतला आहे, की कोणाही पोलिसाला विचारल्यास तो "तपास सुरू आहे' हेच वाक्‍य आपल्या तोंडावर फेकतो. त्याशिवाय कोणतेही वाक्‍य उच्चारत नाही. त्यांना रात्रंदिवस याच एका गोष्टीचा ध्यास लागला आहे. सराफा व्यापाऱ्यांनी स्वसंरक्षणार्थ "चाकू, कुऱ्हाडी, मिरची पूड' ("चाकुमि' त्रिसूत्री) जवळ बाळगावी, असा बहुमोल सल्ला पोलिसांनी दिल्यामुळे जगभरातून पोलिसांच्या या सल्लेबाजीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. समोर दरोडेखोर हातात बंदूक घेऊन उभा राहिल्यावर त्याला "टाइम प्लीज' म्हणत खिशातून तिखटाची पूड कशी काढावी, किंवा काउंटरच्या कप्प्यात दडवून ठेवलेली कुऱ्हाड कशी काढावी, दरम्यान, दरोडेखोराने "ठो।।। ठो।।।' केल्यावर स्वतःच चालत स्वर्गरथ गाठावा की हॉस्पिटल, याबाबत पोलिसांनी मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा सर्वसमान्यांकडून व्यक्त होत आहे. शिवाय कुऱ्हाडीला धार कशी लावावी, मिरची पूडची फेक कशी करावी, याचे प्रशिक्षण देणारे छोटे-छोटे कोर्सेस "हप्त्या-हप्त्या'ने (म्हणजे आवठवड्याने) दिल्यास उपयुक्त ठरतील, अशीही मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे. पोलिसांच्या आवाहनामुळे चाकू, कुऱ्हाडी आणि विशेषतः मिरची पूडची मागणी प्रचंड वाढली असून, याची काळ्याबाजारात विक्री होत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे हा काळाबाजार रोखून या वस्तू रेशनकार्डवर मिळाव्यात असेही मत व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलिसांकडे अनेक महत्त्वाची कामे असताना (राजकीय सभांचा बंदोबस्त, शाहरुख खान पॅटर्नचे वाद, क्रिकेट सामन्यांचे वाद) दरोड्यासारख्या किरकोळ कामांत त्यांना गुंतवू नये, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दरोडेखोर आल्यास स्वसंरक्षणार्थ "चाकू, कुऱ्हाडी, मिरची पूड' अर्थात "चाकुमि' ही त्रिसूत्री अवलंबावी किंवा सरळ-सरळ त्या दरोडेखोराला पाहिजे तेवढा माल स्वहस्ते काढून द्यावा. त्यामुळे त्याला अत्यानंदाने हार्टऍटॅक येऊन दरोडा मन का रेडिओदरोडा टाळण्यासाठी "चाकुमि' त्रिसूत्री!टळेल. तरीही दरोडा पडलाच तर पोलिसांना त्रास होईल अशा तक्रारी करीत बसू नये. आपल्याकडे अधिकची संपत्ती झाली होती, ती दरोडेखोरांनी कमी केली त्यामुळे आपलेच ओझे हलके झाले, अशी संन्यस्त वृत्ती बाळगावी. असे केल्यास आपले स्वास्थ्य चांगले राहील, असे मत धार्मिक वर्तुळातून व्यक्त होत आहे. आजचे ताजे बातमीपत्र संपले. तपास सुरू आहे...

(सकाळमध्ये प्रसिद्धी तारीख ः 2 फेब्रुवारी 2010)

No comments:

Post a Comment

वाचून काय वाटले? मनात ठेवू नका... लगेच प्रतिक्रिया देऊन टाका...