Thursday, May 13, 2010

शोएब भाऊजींची कानपिळणी...

वेलकम बॅक टू मन का रेडिओ... 172.0 एफएमवर. सानिया मिर्झाच्या लग्नाच्या धक्‍क्‍यातून (तिच्या चाहत्यांसाठी धक्काच की!) सावरला असाल तर आता तुम्ही नॉर्मल झाले आहात असे समजून थोडे रिलॅक्‍स होत, आजचा "आँखो देखा हाल, कानों सुना हाल' वाचा. त्याचं काय आहे की, लग्न लागेपर्यंत "सानियाचे लग्न' हा एक राष्ट्रीय प्रश्‍न झाला होता. सानियाच्या टेनिस मॅचवर कधी सट्टा लागल्याच्या बातम्या आल्या नाहीत, पण लग्नावर मात्र सट्टा लागला. तिचा परफॉर्मन्स खराब झाला म्हणून कोणी चिंताग्रस्त झाल्याचे तुम्हाला आठवत नसेल, पण हे लग्न होते की, नाही यावरून मात्र अनेक जण चिंताग्रस्त झाले होते! अशा पार्श्‍वभूमीवर टीव्हीवाल्यांनी लग्न ते बिदाईपर्यंत सर्व सोपस्कार "एक्‍स्लुझिव्हली' दाखवून लोकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. हे टीव्हीवाले हनिमूनपर्यंत गेले नाहीत हेच नशीब म्हणावे लागेल! असो. तर अशा या कव्हरेजमधून एक गोष्ट सर्वांच्याच नजरेतून सुटली ती म्हणजे "शोएब भाऊजींची कानपिळणी'. ही कानपिळणी झाली होती, आणि तिचे कव्हरेज फक्त "मन का रेडिओ'कडेच आहे. या कानपिळणीचे वार्तांकन करण्यासाठी आमचे खास बातमीदार बंडू भांडाफोडकर घटनास्थळी गेले होते. वाचा त्यांचा हा वृत्तांत -

- सांगा, सांगा बंडू भांडाफोडकर, तुम्हाला आता सध्या काय दिसत आहे?

बंडू (नाकावर येणारा जाड भिंगाचा चष्मा सावरत) ः मी "मन का रेडिओ'साठी बंडू भांडाफोडकर थेट हैदराबादहून बोलतोय. आता सध्या नुकतेच लग्न लागून गेले आहे. पाहुणे मंडळी विविध पक्वानांवर ताव मारत आहे. इकडे लगोलग "शोएब भाऊजींची कानपिळणी' सुरू झाली आहे. देशभरातील सानियाच्या चाहत्यांच्या यादीतून मोजक्‍यांची निवड कानपिळणीसाठी ड्रॉद्वारे करण्यात आली होती. खरेतर सानियाच्या सर्वच चाहत्यांची लग्नाला उपस्थित राहण्याची इच्छा होती, पण तसे शक्‍य नसल्याने "कानपिळणी' च्या निमित्ताने मोजक्‍यांची निवड करण्यात आली होती. त्यात गजूभाऊ आणि इतरांचा समावेश होता. यानिमित्ताने का होईना आपल्यापासून सानियाला दूर नेणाऱ्या शोएबचे कान उपटता येतील, असा मनोमनी विचार करून गजूभाऊंनी या समारंभात भाग घेतला. आता मला स्पष्ट दिसत आहे की, गजूभाऊंनी शोएबभाऊजींचा कान हातात धरला आहे...आणि एकच मोठी किंकाळी... शोएब भाऊजींचा कान लालेलाल झाला आहे... पण सांगतो कुणाला? शेवटी गजूभाऊ म्हणजे सानियाचा चाहता! आता गजूभाऊंनी शोएबभाऊजींच्या डोक्‍यावर एक मोठ्ठा पापड ठेवून त्यावरही दणका मारला आहे. पाहता पाहता शोएबच्या डोळ्यांसमोर काजवे चमकत आहेत... एवढे होऊनही शोएब भाऊजींना प्रथेप्रमाणे गज्जूभाऊंचा यथोचित सत्कार करून त्यांना वाटी लावावे लागणार आहेच. शोएब भाऊजींनी हुकूम करताच त्यांच्या नोकराने दुबईच्या पेंडखजुरांचा बॉक्‍स प्रेझेंट म्हणून सादर केला आहे. त्याबरोबरच गज्जूभाऊंना अरबी ड्रेस (दुबईचे शेख, बुखातीर घालतात तसे), टॉवेल-टोपीही देण्यात आली आहे. हा ड्रेस दुबईतील स्टॅंडर्ड मापांनुसार तेथील दर्जीने शिवलेला असल्यामुळे त्यात तीन गज्जू भाऊ मावू शकतील, असा तो झाला आहे! याशिवाय गज्जूभाऊंसाठी दुबईचे विमानप्रवासाचे तिकीट आणि आमंत्रण असलेले पाकीटही प्रेझेंट देण्यात आले आहे. कानपिळणीत लालेलाल झालेला कान लक्षात घेता हे आमंत्रण देऊन शोएब भाऊजींनी "दुबईला ये, पाहून घेतो' असे संकेत दिल्याचे मानले जात आहे. पाकिटात परतीचे तिकीट नसल्याने शोएब भाऊजींनी परतीचे सर्व दरवाजे बंद केल्याचे मानले जात आहे. आता हे आमंत्रण गज्जू भाऊ स्वीकारतील का, "भाईं'च्या देशात जाऊन "भाऊ'गिरी करतील का, हाच प्रश्‍न आहे. बंडू भांडाफोडकर, "मन का रेडिओ'साठी... थेट हैदराबादहून...

(बंडू भांडाफोडकर याचा हा रिपोर्ट खराच आहे, असा आमचा दावा असला तरी शोएब-सानियाच्या लग्नात "कानपिळणी' कशी होणार, हा प्रश्‍न अनुत्तरितच आहे. शिवाय बंडू भांडाफोडकर यांच्या चष्म्याचा नंबर कोणत्याही ऑप्टिकल वाल्याच्या रेंजच्या बाहेर गेलेला असल्यामुळे त्याने केलेले वार्तांकन सानियाच्याच लग्नाचे होते की, एखाद्या "सोनिया'च्या हे सांगता येणे अवघड आहे).

(प्रसिद्धी तारीख ः 18-4-10)

No comments:

Post a Comment

वाचून काय वाटले? मनात ठेवू नका... लगेच प्रतिक्रिया देऊन टाका...