वेलकम बॅक टू मन का रेडिओ... 172.0 एफएमवर. मार्च महिना म्हटला की, लहान मुले सुद्धा "ब' बजेटचा अशी घोकंपट्टी करू लागतात (थोडे जास्त झाले का? सोडून द्या). एकूणच काय की मार्चमहिना बजेटमय होऊन जातो. या पार्श्वभूमीवर "मन का रेडिओ' सादर करीत आहे "बजेट घरघरचे'! यात महिना एक लाख रुपये कमावणाऱ्यापासून ते पाच हजार कमावणाऱ्या व्यक्तीची गृहिणी (घरातील अर्थमंत्री असल्याने) आपला महिन्याचे बजेट सादर करणार आहे. तर वाचू या हे अनोखे बजेट...
गृहिणी नं. 1 (महिना उत्पन्न 1 लाख) ः सर्वात प्रथम म्हणजे मला बजेटबिजेट बनवायला बिलकूल वेळ नाहीय. त्यामुळे माझ्या पी.ए.नेच ते बनविले आहे. त्याला मार्गदर्शन मात्र माझेच आहे. तर माझे बजेट असे ः नोकरचाकर खर्च 20 हजार (यात भांडेवाली, कपडे धुणारी (तिलाही वॉशिंगमशीन आहेच), फरशी पुसणारीपासून ते स्वयंपाक करणारी, मुलाला सांभाळणारी बाई, गार्डन सांभाळणारा माळी आदींचा खर्च यात येतो), मेडिकल खर्च 10 हजार. डोक दुखलं, उगाच घबराट झाली, वजन वाढलं, वजन घटलं असं काहीही झालं तरी मी रिस्क घेत नाही. तत्काळ दवाखाना गाठते. फॅमिलीतील इतरांचीही काळजी अशीच घेते. त्यामुळे एवढे पैसे तर वेगळे ठेवावेच लागतात. पॉकेटमनी 10 हजार. माझा मुलगा फार हौशी. मोबाईल कंपनीने मोबाईल लॉंच केला, कोणत्याही कंपनीची गाडी आली रे आली की त्याला नवे मॉडेल पाहिजे असते. शिवाय आठवड्यातून तीन-चार वेळा त्याला मित्रमंडळींबरोबर पार्टी करावीच लागते. आता स्टेटस् राखायचे म्हणजे हे करावेच लागते. पॉकिटमनी मस्टच आहे. शॉपिंग 50 हजार! शॉपिंग करणे ही माझी हॉबी आहे. एक दिवस नवी वस्तू आणली नाही ना मला करमतच नाही. आज काय अमूक बाजार, उद्या काय तमूक बाजार. मनोरंजन 10 हजार. यात पिक्चर, स्टेज शो पाहिल्याशिवाय मला चैनच पडत नाही. पुढे...
- अहो बाई तुमचे झाले की एक लाख. बाकी काही जीवनावश्यक बाबींवर खर्च करता की नाही?
गृहिणी नं. 2 (महिना उत्पन्न 25 हजार) ः आता हे काय उत्पन्न आहे? तरी यांना म्हणत असते नोकरी सोडून दुसरं काही पहा म्हणून. असो. अहो साधा हिशोब आहे. 5 हजार फ्लॅटचे भाडे, 5 हजारांचा किराणा, 5 हजारांची बिलं, 5 हजार एज्युकेशनल खर्च, 1 हजार पेट्रोल, 1 हजार... जाऊ द्या. बाकी राहते शून्य. महिन्याच्या शेवटी पुन्हा "दे दान सुटे गिऱ्हाण' म्हटल्यासारखे उधारी मागत फिरावे लागते.
गृहिणी नं. 3 (महिना उत्पन्न पाच हजार) ः आम्हाला कुठे बजेट असते का बाबा? जसे आले तसे दिवस कटवायचे, एवढेच आम्हाला माहित. कोणतेही स्वप्न पहायचे नाही, अन् पाहिलेच तर नंतर त्याची कटिंग करून ते आपल्या बजेटच्या मापात बसवायचे यातच महिना निघून जातो.
मित्रांनो, हे शेवटचे बजेट वाचून तुमच्याप्रमाणेच "मन का रेडिओ' दुखी झालाय. थोडंस फ्रेश होण्यासाठी खालील गाण्याचा तडका घ्या मारून आणि बना दगड...
(चाल ः भोली सूरत दिल के...)
मोटी पगार, बजेट मोटे...
बजेट छोटा और सपने टूटे...
नये जमाने की, ये नयी रीत रे...
हात में मोबाईल, कान में बाली...
कान में बाली रे...
मोटी पगार, बजेट मोटे.....
(सकाळमध्ये प्रसिद्धी तारीख ः 28-3-2010)
No comments:
Post a Comment
वाचून काय वाटले? मनात ठेवू नका... लगेच प्रतिक्रिया देऊन टाका...