वेलकम बॅक टू मन का रेडिओ... 172.0 एफएमवर आपले स्वागत आहे. मान्य आहे, की तेच तेच स्वागत वाचून तुम्ही आगदी बोर झाला आहात; पण काय करणार, काही काही गोष्टी टाळता येत नाहीत. आपली क्रिकेटची टीम कितीही पराभूत झाली तरी आपण मॅच पाहणे काही सोडतो का? अन् तेही मॅच खेळणे सोडतात का? असो. असे असले तरी "मन का रेडिओ' तमाम क्रिकेट रसिकांच्या भावनांची कदर करते. "भारतीय संघ का हरला' याचा शोध घेण्यासाठी आम्ही तत्काळ "एम.आय.डी'ची अर्थात "सीआयडी'च्या धर्तीवर "मन का रेडिओ इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट'ची स्थापना केली आहे. "एमआयडी'तील प्रमुख सहकारी आहेत- एसीपी दृष्टद्युम्न, गया, कभीकभीजित, डॉ. काळुंके, रॉड्रिक्स इ. तर या सहकाऱ्यांनी थेट वेस्ट इंडिजमध्ये जाऊन "भारतीय संघ का हारला' याचे सविस्तर इन्व्हेस्टिगेशन केले. त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आमचे बातमीदार बंडू भांडाफोडकर यांनी केलंय आणि त्याचे लेखी रूपांतर आज तुम्हाला सादर करण्यात आम्हाला आनंद होत आहे. तर वाचा "एमआयडी स्पेशल एपिसोड- एक दिन इंडियन टीम के खिलाफ'!
एसीपी दृष्टद्युम्न ः गया, आपण इथं वेस्ट इंडिजमध्ये आलो आहोत, भारतीय संघ का हरला, याचा शोध घेण्यासाठी. याने की वारदात की जगह आपण बरोबर गाठलीय; पण तुला काही क्ल्यू लागलाय का?
(तेवढ्यात रॉड्रिक्स घाबरलेल्या मूडमध्ये धावत येतो. आणि म्हणतो...)
रॉड्रिक्स ः एसीपी... एसीपी... एका स्डेटियमबाहेर एक लाश सापडलीय. क्रिकेट रसिकांचे म्हणणे आहे, की ती भारतीय क्रिकेट संघाची आहे. लाश ताब्यात घेऊन फौरन डॉ. काळुंकेकडे सोपविली आहे. आपल्याला त्यांनी बोलावलंय. (सगळे डॉ. काळुंकेकडे जातात.)
डॉ. काळुंके (भारतीय संघाच्या लाशकडे पाहात) ः एसीपी... लाश काफी श्रीमंत वाटते, म्हणजे ती भारतीय संघाचीच आहे, यात वादच नाही. लाश बुरी तरहसे जखमी हुई है... ठिकठिकाणी उसळते चेंडू लागलेत. आपण इंडियातल्या पाटा खेळपट्ट्यांवरचे शेर. इथं वेस्ट इंडिजमध्ये हेच होणार. आणखी एक गोष्ट लाश फार थकलेली वाटते. म्हणजे मरण्यापूर्वी वेगवेगळ्या पार्ट्या अटेंड केल्याने असे झाले असावे. तिच्यातील जिंकण्याची जिद्द असलेले जिन्स कोणीतरी काढून घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे. कोणी केले असावे बरे हे काम?
रॉड्रिक्स ः मैं बताऊं बताऊं...
कभीकभीजित ः रहेने दो रॉड्रिक्स... फिर कभी. मला वाटते एसीपी आपण आता एखाद्या पबला भेट देऊन स्थानिक लोकांकडून इन्फर्मेशन घ्यायला हवी.
एसीपी ः मलाही तसेच वाटते. लेटस् गो...
(सर्वजण वेस्ट इंडिजमधील एका प्रसिद्ध पबवर जातात. तेथे सर्वत्र सन्नाटा... दरवाजा लावलेला.)
कभीकभीजित ः वेस्ट इंडिजमधील प्रसिद्ध पब आणि एवढा सन्नाटा? कुछ तो भी गडबड है. दरवाजा भी बंद है. गया तोड दो दरवाजा!
गया ः वारे वाऽऽऽ! सारखे दरवाजे तोडून तोडून माझे तंगडे आऊट झालेय. या रॉड्रिक्सला सांगा ना.
एसीपी ः गया डोंट वेस्ट टाईम. इट इज माय ऑर्डर. तोड दो दरवाजा.
(गया एक लात मारतो, त्यासरशी दरवाजा उघडतो; पण पाय फ्रॅक्चर. आतून विचित्र वास भपकन सर्वांच्या तोंडावर येतो...)
एसीपी ः ये स्मेल कैसी है... ये कहीं पर तो भी सुंघी हुई लगती हैं.
रॉड्रिक्स ः हां सर, ये स्मेल इंडियन टीम कीही है... इसका मतलब उस रात इंडियन टीम यहॉं पबमें पार्टी करने के लिए आई थी.
एसीपी ः अगर उस रात इंडियन टीम यहॉं आई थी तो दुसरे दिन ग्राऊंड में क्या खेली होगी? आणि लाश जखमी झाली ती येथे कोणाशी तरी मारामाऱ्या केल्या म्हणूनच झाली असावी.
कभीकभीजित ः सर केस एकदम साफ है. भारतीय संघ स्वतःच्याच चुकांमुळेच हरला.
एसीपी ः अरे, हेच कारण सांगायचे होते तर "मन का रेडिओ'ने एवढा खर्च करून इथं सातासमुद्रापार आपल्याला कशाला पाठविले असते. सोचो... सोचो... कोई दुसरा अच्छासा कारण होगा...
रॉड्रिक्स ः सर मी किती वेळचा सांगायचा प्रयत्न करतोय; पण कोणी मला बोलूच देत नाही. "वीरू की मॉं' काय म्हणाली, माहितेय ना! भारतीय क्रिकटपटूंना पार्ट्या आणि बायकांपासून दूर ठेवा म्हणून. तेच खरे कारण आहे!
गया ः इनफ इज इनफ... एसीपी काहीही कारणं सांगता. म्हणे भारतीय संघ का हरला. अरे हा काही संशोधनाचा विषय आहे? इतके दिवस इंडियन टीम जिंकत होती, तेव्हा सगळे "चिअर गर्ल'सारखे वेडेवाकडे नाचत होते. ऑस्ट्रेलियासारख्या नंबर वन टीमची हालत आपण पतली करून टाकली, कधी नव्हे ते नंबर वन झालो. तेव्हा कसे सर्वजण धोनीला "कॅप्टन कूल' म्हणायचे अन् आता एकदम "कॅप्टन फूल!' तुम्हाला करायची असेल तर खुशाल करा "एमआयडी'गिरी... गया तो गया इंडिया वापस!
एसीपी ः काहीही असो, क्राईम झालाय तर जुर्माना तर भरावाच लागेल... कॅप्टन म्हणून धोनीला... हाऽऽऽ हाऽऽऽ हाऽऽऽ
(औरंगाबाद "सकाळ'मध्ये प्रसिद्धी तारीख ः 16 मे 2010 )
No comments:
Post a Comment
वाचून काय वाटले? मनात ठेवू नका... लगेच प्रतिक्रिया देऊन टाका...