Wednesday, May 26, 2010

गाणे हिट होते पब्लिकमुळे!

वेलकम बॅक टू मन का रेडिओ. 172.0 एफएमवर. पिक्‍चरमधील गाणे हिट होते कोणामुळे असा वाद सध्या आमीर खान - जावेद अख्तरमध्ये सुरू आहे. आमीर म्हणतो, गाणे स्टारमुळे हिट होते, तर जावेदभाई म्हणतात गीतकारामुळे. या वादात कॅटरिनाने तेल ओतले असून गाणे संगीतकारांमुळे हिट होते, असा सूर आळवला आहे. यात आता "मन का रेडिओ' अणुबॉंब टाकणार आहे. त्याचं काय आहे की, "मन का रेडिओ'ने वाचकांचा घेतलेला कौल वेगळेच सांगतो. त्यांचे म्हणणे आहे, "गाणे हिट होते ते पब्लिकमुळे'! या कौलाअंतर्गत प्रातिनिधिक म्हणून घेण्यात आलेली "प्रचंड' सिनेप्रेमी मुन्नाभाई यांची मुलाखत वाचा... पण या गाण्याच्या ब्रेकनंतर...

खेत गये बाबा,
बाजार गई मॉं
कैसे आये गोरी
हम तोरे घरमा...

मुन्नाभाई ः आऊ ललिता, काय भारी गाना लावला. एकदम तब्येत हरीभरी झाली. मला इथे बोलावून तुम्ही जे भी काही केले ना, त्याबद्दल मी तुमचा "थॅंक्‍यू' आहे.

- मुन्नाभाई, तुम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून "फर्स्ट डे फर्स्ट शो' हिंदी पिक्‍चर पाहता. मग तुम्हीच सांगा गाणे कोणामुळे हिट होते ते!

मुन्नाभाई ः अरे बाबा, माझी अख्खी जिंदगी थिएटरमधी गेली. मी बाहेर कमी अन्‌ थिएटरमध्ये जादा असतो. आतापर्यंत एकबी पिक्‍चर सोडला नाय. राजकपूरच्या "श्री 420'पासून ते पार "थ्री इडियट'पर्यंत! मिथुनदाचा "गुंडा'सारखा फालतू चित्रपटही पाहिला या पठ्ठ्यानं. "गुंडा' चित्रपट पाहिला होता का तुम्ही. नाही...? बरे झाले... नाही पाहिला ते. इतका "इमोशनल अत्याचार' अन्‌ ते पण पब्लिकवर मी नाय पायला. अरे बाबा तुम्ही वर गाणे वाजवले ना, त्यात लिहिणाऱ्याने काय अकलेचे तारे तोडले आणि वाजवणाऱ्याने काय बडवले, तुम्हीच सांगा. पण माझ्यासारख्याची तब्येत हरीभरी झाली का नाय? अरे बाबा असेच असते. कोणाला काय आवडेल काय सांगता येते का? उगाच फालतूचा लफडा कोणी सांगितला. म्हणे गाणे माझ्यामुळे हिट झाले अन्‌ त्याच्यामुळे! अरे, बाबा आमच्यासारख्या पब्लिकने असल्या गाण्यांना डोक्‍यावर घेतले म्हणून तर ते हिट झाले ना? आता तूच सांग "बिग बी' गातो म्हणून अनेक बड्या स्टारनी पब्लिकवर गळा साफ करून घेतला. आमीरभाई, संजू बाबा, गोविंदा, श्रीदेवी हे म्हणजे काय "गानसम्राट' अन्‌ "गानसम्राज्ञी' आहेत का काय? त्यांचे गाणे कोणी गोड मानून घेतले, पब्लिकने! मग खरे गाणे हिट कोण करते - पब्लिक! माझ्या पसंतीचे एक गाणे लावा बरं...

ओ... सजना,
क्‍या ये मेरा पहेला पहेला प्यार हैं!

मुन्नाभाई ः ऐकला का गाना? काय वाटते? अरे सदर नटी आता किती वेळा प्रेमप्रकरणात पडणार, असाच सवाल उभा राहते की नाही? आता अशा ओळी ही गीतकार मंडळी लिहिणार असली तर काय म्हणणार? सुपरस्टारचे गाणे फ्लॉप होत नाही किंवा चांगले गाणे असले तरी चित्रपट फ्लॉप होत नाही, असे तर काही नाही ना!

मुन्नाभाईंच्या क्रांतिकारक विचारांनंतर खालील गाणे वाचा, विचार करा, संशोधन करा अन्‌ पहिल्या ओळीतील शब्दांचा अर्थ हाती लागल्यास पाठवून द्या "मन का रेडिओ'कडे...गाणे असे आहे-

केंदी पो... पची केम,
केंदी ए...ओ जाने जाना...
गोरी दे नखरे सोने लगदे...
मेनू गोरी दे नखरे...

("सकाळ'मध्ये प्रसिद्धी तारीख ः 21 फेब्रुवारी, 2010)

No comments:

Post a Comment

वाचून काय वाटले? मनात ठेवू नका... लगेच प्रतिक्रिया देऊन टाका...