गिफ्ट खरिदा मैनें तेरे लिए...
उसके लिए लोन निकाला मैनें तेरे लिए...
वेलकम बॅक टू "मन का रेडिओ'... 172.0 एफएमवर... पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या ठळक बातम्या... सॉरी आजची एकमेव ठळक बातमी... एका भारतीय उद्योगपतीने आपल्या पत्नीस 1600 कोटी रुपयांचे गिफ्ट दिल्यामुळे देशभरातील महिलांत असंतोष उफाळला असून त्याचे पडसाद देशभरातील घराघरांत पडत आहेत. "कहानी घर घर की' अशी परिस्थिती झाली असून आमचे विशेष बातमीदार बंडू भांडाफोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या ऐतिहासिक घटनेने देश ढवळून निघाला आहे. अखिल भारतीय महिला अन्याय निवारण संघटनेतर्फे सदर उद्योगपतींचे अभिनंदन करण्यात आले असून देशभरातील इतर तमाम (चिक्कू, गिफ्ट न देणाऱ्या) नवरोबांची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. आता सविस्तर वृत्त- एका भारतीय उद्योगपतीने 1600 कोटींचे गिफ्ट आपल्या पत्नीस देऊन समस्त नवरे मंडळींना अडचणीत आणले आहे. नव्हे आपल्या हाताने आपल्या पायावर "धोंडा' तोही धोंड्याच्या महिन्यात मारून घेतला, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. अखिल भारतीय महिला अन्याय निवारण संघटनेने सदर घटना गांभीर्याने घेतली असून लवकरच इतर (चिक्कू, गिफ्ट न देणाऱ्या) नवरोबांविरुद्ध देशव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. साधारणतः प्रेमविवाह करणाऱ्या तरुणीला लग्नापूर्वी किती आणि लग्नानंतर किती गिफ्ट मिळाले, याचा संशोधनात्मक, तुलनात्मक अभ्यास करून त्याचा अहवाल सीबीआयने सादर करावा, अशी मागणी जोर धरत आहे. पारंपरिक पद्धतीने विवाह केलेल्या महिलांची परिस्थिती यापेक्षाही भीषण असते. त्यांना थेट लग्नानंतर गिफ्टची अपेक्षा असताना त्यांना 1600 कोटी तर जाऊच द्या साधे 16 रुपयांचे गिफ्टही नवरेमंडळी देत नाहीत, ही खरी खंत असल्याची चर्चा देशभरात होत आहे. इतर
(म्हणजे कोणत्या हे लक्षात घ्यावे) ठिकाणी गिफ्ट देताना मात्र सढळ हाताने उधळपट्टी केली जाते. सर्वसामान्य महिलेची गिफ्टची अपेक्षा तरी किती असणार? एखादा गजरा आपल्या नवरोबाने घेऊन यावा, एवढी अपेक्षासुद्धा पूर्ण होत नाही. याचा निषेध घराघरांतून व्यक्त होत आहे. "गिफ्ट' टाळण्यासाठी कारणे काय, तर पगार पुरत नाही, या महिन्यात आमक्याचे अमुक अमुक देणे आहे, या महिन्यात काय पाहुणे येणार आहेत इ. इ... अशा फुटकळ कारणांना महिला वर्गाने यापुढे तरी भीक घालू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. "गिफ्ट' हा पत्नीचा कायदेशीर हक्क करावा, महिन्यातून कमीत कमी दोन वेळा आणि जास्तीत जास्त कितीही वेळा गिफ्ट देणे नवरोबांना कंपलसरी करणारा कायदा पारित करण्यात यावा, अशी मागणी देशभरातील महिला वर्गाकडून करण्यात येत आहे. एकूणच देशभरात घराघरांत असंतोष उफाळला आहे. सदर उद्योगपतीने 1600 कोटी रुपयांचे गिफ्ट दिल्यापासून प्राप्त आकडेवारीनुसार देशभरात लाखो नवरोबांना तत्काळ "गिफ्ट द्या, नसता...' अशा आशयाच्या फतव्याचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, अखिल भारतीय पुरुष अन्याय निवारण संघटनेतर्फे मात्र सदर उद्योगपतींचा निषेध करण्यात आला आहे. एवढे मोठ्ठे गिफ्ट देण्याची गरजच काय होती, आता याची फळे देशभरातील तमाम नवरोबांना भोगावी लागणार आहे, असे या संघटनेच्या प्रवक्त्याने नवी दिल्लीत सांगितले. एकूणच या "गिफ्ट' प्रकरणामागे एखाद्या परकीय शक्तीचा हात असावा का, याचीही "जॉंच' करावी, अशी मागणी होत आहे. शक्य झाल्यास अमेरिकेने मध्यस्थी करावी, असेही काहींचे (तज्ज्ञांचे) म्हणणे आहे. सदर बातम्या येथेच संपवीत आहोत. सदर उद्घोषकाला तत्काळ "गिफ्ट' खरेदीसाठी जाणे आवश्यक असल्यामुळे त्याला रजा द्यावी. शेवटी वाचा एक गाणे...
मुझको भी तो गिफ्ट दिला दें...
ऐसे ऐसों को दिया हैं,
ऐसे वैसों को दिया हैं,
बंगला, नहीं तो कार दिला दें..
मुझको भी तो गिफ्ट दिला दें...
'सकाळ'मध्ये प्रसिद्धी ता.23-4-10
तुमच्या आयचा गो
ReplyDelete