वेलकम बॅक टू मन का रेडिओ... 172.0 एफएमवर आपले स्वागत आहे. आज तुम्ही ऐकणार आहात तो विषय दोन दिवस जुना असला तरी हिट आहे. त्याचं काय आहे की, दोनच दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी "लोकल'ने सफर केली. आता या लोकलमध्ये काय झाले, कसे झाले याची लाईव्ह कॉमेंट्री तुमचा आवडता आरजे पद्याने रेकॉर्ड करून ठेवली आहे. ही कॉमेंट्री त्यामुळेच "एक्स्कुझिव्ह' झाली आहे. तीच कॉमेंट्री पुन्हा प्रसारित करीत आहोत... तर मग वाचा ओन्ली ऑन मन का रेडिओ...वेलकम टू मन का रेडिओ...राहुल गांधी यांचा ताफा अंधेरी रेल्वेस्थानकाकडे निघाला आहे. आणि हे काय, त्यांची गाडी थांबली. एक्स्ट्रॉ कव्हरला एक एक्स्ट्रॉ सुरक्षा रक्षक, मिडऑनला एक, गलीत एक... राहुलजींनी आता खिशात "हात' घातलाय. पुन्हा बाहेर काढलाय. हातात बहुतेक काही तरी कार्ड दिसतंय. फुटबॉल पंच दाखवतात तसं नाही. ते तर एटीएम कार्ड आहे. आता ते नजीकच्या "एटीएम'मध्ये घुसलेत. बाहेर आलेत. आणि हे काय... ते थेट रांगेत उभे! तिकीट देणाराच आश्चर्याने गोरामोरा झालाय. तिकीट काढून ते आता लोकलमध्ये घुसताहेत. आमचीही त्यांच्यामागे लोकलमध्ये घुसण्याची धडपड सुरू आहे. ते तर आरामशीर चढले... पण आमचा पाय... पाय... आई गं... पाय स्टेशनवरच राहिला की काय? आला... आला.. आत आलाय पाय! हुश्श... चढलो बुवा एकदाचे लोकलमध्ये... मायक्रोफोन सांभाळत. पण राहुल गांधी कोठे गेलेत? कोठे गेले... त्यांना आम्ही लवकरच शोधून काढूत... तोपर्यंत ऐका एक टाईमपास गाणे...अरे दिवानों मुझे पहचानोंमैं हूँ कौन, मैं हूँ कौन,खान खान खान...राहुल गांधी बहुतेक पुढच्या डब्यात पोचलेत वाटते. आम्हीही एक एक इंच भूमी लढवत पुढे पुढे सरकत आहोत. पण हे काय... हा एक हिरोसारखा दिसणारा कोण? "र र र राहुलजी, माय नेम इज... मी आता "फोर्टी प्लस' झालोय. मी पिक्चरमध्ये म्हातारा झालोय; पण राजकारणाच्या दृष्टीने तरुणच आहे. मलाही राजकारण जॉईन करायचंय. माझेही प्रयत्न सुरू आहेत... र..र...राहुलजी... असे ओरडत तोही हळूहळू पुढे सरकत आहे. आणि हा डोक्याला टक्कल पडलेला "कॉमन मॅन' मध्येच कुठून आला. त्यालाही भेटायचे म्हणे, राहुलजींना! तर मंडळी राहुलजींना गाठेपर्यंत ऐकूया या "कॉमन मॅन'चे मत या "लोकल यात्रे'बद्दल...मित्रा, "कॉमन मॅना' या इथे गर्दीत काय करतोयस तू... "कॉमन मॅन'ने इकडेतिकडे बिचकत बिचकत पाहिले आणि हळूच एक चिठ्ठी हातात दिलीय. थांबा उघडूनच पाहतो. अरेच्या यात तर शेतकऱ्याच्या आत्महत्या, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, विषमता... मुंबई... असे शब्द दिसताहेत. कशाला नसती झंझट. ताबडतोब खिशात ठेवलेली बरी. "ऑल इज वेल'! अरे सामान्य माणसा, मी तुझी चिठ्ठी पोचवतो, राहुलजींकडे... ते नक्कीच करतील काही तरी... आता राहुलजींमध्ये आणि आमच्यात दोन डब्यांचे अंतर पडलेय. सगळीकडे उत्साही वातावरण... ताफा पुढे पुढे सरकतोय... आमच्या हातात "कॉमन मॅन'ची चिठ्ठी तशीच आहे... आता रेंज चाललीय. मन का रेडिओची कॉमेंट्री येथेच संपवीत आहोत. खर्ररर खर्रररर...
("सकाळ'मध्ये प्रसिद्धी तारीख ः 7 फेब्रुवारी, 2010)
No comments:
Post a Comment
वाचून काय वाटले? मनात ठेवू नका... लगेच प्रतिक्रिया देऊन टाका...